२७ लाखांची फसवणूक

ठाणे : सोशल मीडियावर मेसेज करून शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवून 44 वर्षीय महिलेची 27 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार ठाण्यात घडला. या प्रकरणी वागळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील तक्रारदार 44 वर्षीय महिला ह्या ठाण्यातील रघुनाथ नगर परिसरात राहतात. दरम्यान, त्यांना 10 जानेवारी ते 21 फेब्रुवारी 2024 या कालावधीत काही अनोळखी इसमांनी इंस्टाग्राम अकाउंट व मोबाईलवर मॅसेज करून ऑनलाईन शेअर मार्केटमधून शेअर्स व आयपीओ खरेदी केल्यास मोठा परतावा मिळेल अशी बतावणी केली. त्यानंतर तक्रारदार यांचा विश्वास संपादन करून महिलेकडून शेयर खरेदीच्या नावाखाली वेळोवेळी 27 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र कुठलाही परतावा परत केला नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी वागळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.