बेलापूर विधानसभेतील २७ माजी नगरसेवकांची पुन्हा घरवापसी

नवी मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार संदीप नाईक यांच्या सोबत बेलापूर विधानसभेतील माजी नगरसेवकांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी म्हणत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. मात्र या २७ माजी नगरसेवकांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पुन्हा एकदा भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी २९ पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपात प्रवेश केला.

विधानसभेचे बिगुल वाजताच भाजपतर्फे ऐरोलीमध्ये गणेश नाईक यांनी तर बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती. बेलापूर विधान सभेसाठी माजी आमदार व तत्कालिन भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे इच्छुक होते. मात्र पक्षाने आमदार मंदा म्हात्रे यांच्यावर विश्वास दाखवत तिसऱ्यांदा उमेदवारी बहाल केली. त्यामुळे नाराज झालेल्या संदीप नाईक यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात तुतारी फुंकत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी बेलापूर विधानसभेतील भाजपच्या २७ माजी नगरसेवकांनी देखील संदीप नाईक यांच्यासोबत प्रवेश केला.

विधानसभा निवडणुकीत संदीप नाईक यांना अवघ्या ३७७ मतांनी पराभव पत्करावा लागला. ऐरोली मतदार संघातून गणेश नाईक यांनी ९१ हजार मताधिक्याने विजय मिळवत मंत्रीपदाची माळ गळ्यात पाडून घेतली. त्यामुळे नवी मुंबईचे सत्ताकेंद्र पुन्हा एकदा गणेश नाईक यांच्याकडे आल्याने आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या माजी नगरसेवकांनी घरवापसी करत मंगळवार १८ फेब्रुवारी रोजी दादरमधील पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पुन्हा एकदा भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी भाजप महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, महासचिव विक्रांत पाटील, माजी खासदार डॉ.संजीव नाईक, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आदी मान्यवर उपस्थित होते.