कामाचा दर्जा सुधारून गती मिळणार
उल्हासनगर : आयुक्त अजीज शेख यांच्या निर्देशान्वये रिक्त असलेल्या पदांवर उल्हासनगर महानगरपालिकेत २६ कनिष्ठ अभियंते दाखल होणार आहेत. त्यामुळे अभियंत्यांची वानवा संपणार आहे. तर कामाचा दर्जा सुधारून तांत्रिक कामांना गती मिळणार असल्याची माहिती मुख्यालय उपआयुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.
पालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभागात संदीप जाधव, तरुण सेवकानी, अश्विनी आहुजा, नगररचना विभागात संजय पवार, पाणी पुरवठा विभागात परमेश्वर बुडगे, दीपक ढोले असे बोटावर मोजण्याइतपत कनिष्ठ अभियंते आहेत. अभियंत्यांच्या कमतरतेमुळे कामाची तपासणी करताना तारेवरची कसरत करावी लागत असून कामाला गतीही मिळत नव्हती.
ही निकड लक्षात घेऊन आयुक्त अजीज शेख यांच्या निर्देशानुसार कंत्राटी पध्दतीने २६ कनिष्ठ अभियंत्यांची पदे भरण्यात येणार आहेत. या अभियंत्यांना प्रत्येकी २६ हजार रुपये पगार देण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहे. २६ कनिष्ठ अभियंत्यांपैकी सार्वजनिक बांधकाम विभागात १०, पाणीपुरवठा विभागात सहा, नगररचना विभाग चार, प्रभागनिहाय चार, विद्युत विभाग एक आणि मालमत्ता विभागात एक अशा नियुक्त्या देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यालय उपआयुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.