ठाणे : शहरातील कोरोना रूग्ण वाढीचा आलेख चढताच असून आज २५१ नवीन रुग्णांची भर पडली तर २३२जण रोगमुक्त झाले. सलग तीन दिवस कोरोना रुग्णांचा मृत्यू होत असल्याने ठाणेकरांची चिंता वाढली आहे.
महापालिका हद्दीत सर्वाधिक ११८ रुग्णांची भर माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात पडली आहे. वर्तकनगर येथे ४३, उथळसरमध्ये २० आणि १७ रूग्ण वागळे प्रभाग समिती परिसरात वाढले आहेत. प्रत्येकी ११ रूग्ण मुंब्रा, लोकमान्य-सावरकर नगर आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रात वाढले आहेत. कळवा प्रभाग समिती भागात नऊ आणि सर्वात कमी सात रूग्ण नौपाडा-कोपरी प्रभाग समिती भागात नोंदवले गेले आहेत. चार रुग्णांच्या घरचा पत्ता मिळाला नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी २३२जण कोरोनामुक्त झाले आहेत आत्तापर्यंत एक लाख ८६,२९३जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी २,२६६जणांवर उपचार सुरू आहेत. आज एक रूग्ण दगावला असून आत्तापर्यंत २,१३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील १,४१२ नागरिकांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये २५१जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २४ लाख ६२,९१७ ठाणेकरांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एक लाख ९०,६९४ जण बाधित सापडले आहेत.