रुग्णालयात उपचार सुरू
डहाणू : डहाणू तालुक्यातील डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या रणकोळ आश्रम शाळेतील २५० विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राज्यातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये किडे, मुंग्या, आळ्या, झुरळ, बेडूक आढळल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यातल्या आंबेगावमधील एका आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दुधामध्ये आळ्या आढळल्या होत्या. आता डहाणूतील या घटनेने खळबळ उडाली आहे.
पहाटे पाचच्या सुमारास उलटी आणि जुलाब सुरू झाल्याने या विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. त्यांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जेवणातून आणि पाण्यातून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली या विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, धाराशिवमध्ये पोषण आहारामध्ये मृत बेडूक आढल्याची घटना समोर आली होती. तर घाटकोपच्या केव्हीके शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनामध्ये झुरळ आढळले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, शाळा आणि सरकारला धारेवर धरले.