राजन विचारे यांच्याविरोधात युवासेनेचे मनोरुग्णालयाबाहेर आंदोलन

ठाणे: काल ठाण्याचे माजी खासदार शिवसेना नेते राजन विचारे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध शिवसेना युवा सेनेच्या वतीने करण्यात आला. राजन विचारे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, म्हणून त्यांना ठाण्यातील मनोरुग्णालयात दाखल करा, अशी मागणी करत युवा सेनेच्या वतीने मनोरुग्णालयासमोर आंदोलन केले.

अतिरेक्यांना भारतीय सैन्याने ठार मारले, म्हणजे उपकार केले का, असे वक्तव्य राजन विचारे यांनी केले होते. या वक्तव्यामुळे सैन्याचा अपमान झाला असून भारतीयांच्या भावना देखील दुखावल्या आहेत. विचारे यांनी ताबडतोब सैन्य दलाची आणि नागरिकांची माफी मागावी, असे निवेदन यावेळी युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य व ठाणे-धाराशिव लोकसभा प्रमुख नितीन लांडगे यांनी दिले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडत असून कालांतराने त्यांना ठाण्याच्या मनोरुग्णालयात ठेवावे लागणार. आता ठाण्याच्या मनोरुग्णालयाचे नाव बदली करून उबाठा मनोरुग्णालय असे करावे लागेल, असे यावेळी युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य व ठाणे, धाराशिव लोकसभा प्रमुख नितीन लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणा बाजी करत निदर्शने करण्यात आली.