मराठी शाळांना पुन्हा आले सुगीचे दिवस
डोंबिवली : कोरोना महामारीमुळे आर्थिक डबघाई व बेकारीमुळे महागडा शैक्षणिक खर्च पालकांना अशक्य होत गेला. परिणामी पालकांनी पुन्हा कमी खर्चीक आणि दर्जेदार मराठी माध्यमातील सेमी इंग्रजी पर्याय शोधला. इंग्रजी माध्यम असलेल्या २५ टक्के विद्यार्थ्यांनी मराठी शाळेत प्रवेश घेतला. या बदलामुळे मराठी माध्यम शाळा संस्था चालकांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत.
आधुनिक काळात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळेची मागणी सर्रास होऊ लागली. सामान्य पालकांनी इंग्रजी माध्यम शाळेला पसंती दिली आणि यामुळे मराठी माध्यमाच्या दर्जेदार शाळा विद्यार्थी मिळत नसल्याने ओस पडू लागल्या. पण दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीत आर्थिक परिस्थिती आणि बेकारीचे सावट सर्वसामान्यांवर आले. इंग्रजी माध्यम शाळेची फी भरणे आणि इतर खर्च डोईजड झाला. विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडण्याची वेळ येऊ लागली. हा अनुभव पालकांना कोरोनाकाळात आल्याने आता शैक्षणिक फी चा विचार करून पालकांनी पुन्हा कमी फी असलेल्या खासगी शासकीय अनुदानित मराठी माध्यम शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास सुरुवात केली आहे. परिणामी 25 टक्के इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांनी पुन्हा सेमी इंग्रजीची सोय असलेल्या मराठी माध्यम शाळेत प्रवेश घेतल्याचे दिसून येत आहे. मराठी माध्यम शाळेत सेमी इंग्रजी माध्यम असल्याने कोणतीच अडचण येत नसल्याचे पालक सांगत आहेत.
याबाबत शहरातील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे कार्यवाह आशीर्वाद बोन्द्रे यांनी सांगितले की, पूर्वी आमच्या शाळेत प्रवेशासाठी रांगा लागत होत्या.