अंबरनाथ : अल्युमिनियमच्या २५ लाख रुपये किंमतीच्या तारा पळवणाऱ्या ११ जणांच्या टोळीला मुद्देमालासह गजाआड करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली.
नॅशनल पॉवर ग्रिड अंतर्गत मुंबई ऊर्जा कंपनीच्या माध्यमातून अंबरनाथला प्रकल्प राबवण्यात येत आहे. या कंपनीसोबत ट्रान्समिशनसाठी केईसी इंटरनॅशनल लिमिटेड ही उपकंपनी काम करत आहे. या कंपनीचे अंबरनाथ एमआयडीसीमध्ये प्रकल्पाचे काम सुरू असताना २७ आणि २८ मे रोजी रात्रीच्या सुमाराला ट्रान्समिशनसाठी लावलेल्या २५ लाख रुपयांच्या ॲल्युमिनियमच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरल्या होत्या. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे , सहायक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अशोक भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास करून टोळीला अटक करण्यात यश आले.
शिवाजीनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपासाच्या मदतीने ११ आरोपींना अटक केली असून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी घटनेतील आरोपी आणि सराईत गुन्हेगार तौकीर जमालुद्दीन खान याला धारावी येथून अटक केली, त्यानंतर त्याची चौकशी करून घटनेतील इतर आरोपी सरोजकुमार जयस्वार, गणेश पटेल, अरुण सिंग, आकाश मीना, समीर खान,विकास म्हेत्रे, परवेझ खान, शिवकरण गुप्ता, रामलाल पटेल, कादर खान आणि सद्दाम अली यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरला गेलेल्या अल्युमियमच्या तारा, गुन्ह्यात वापरलेली कार, एक पिकअप आणि दोन मिनी टेम्पो असा 29 लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला शिवाजीनगर पोलिसांनी दिली.