ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्यावतीने प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत शहरातील दुकानांमधील २४ किलो प्लास्टिक जप्त करून २६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार सदरची कारवाई करण्यात आली आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार ७५ मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या एकदाच वापर होणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या, भांडी व थर्माकोल यांसारख्या अविघटनशील वस्तू वापरण्यास बंदी घालण्यात आली असून या वस्तूंचा वापर आढळल्यास संबधितांवर दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
शहरात प्लास्टीक बंदी, माझी वसुंधरा व स्वच्छता मोहिमेअंतर्गत स्वच्छता तसेच प्लस्टिक बंदीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर्व प्रभाग समितीच्या स्तरावर उपक्रम राबविण्यासोबतच प्लास्टिक वापरणाऱ्या आस्थापनेवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी प्रदूषण नियंत्रण विभागास दिले आहेत. त्या आदेशानुसार महापालिकेच्या सर्व प्रभागसमिती स्तरावर प्लास्टिक वापरणाऱ्या आस्थापनावर कडक कारवाई करण्याचे काम सुरु आहे.
प्लास्टीक बंदी कारवाईतंर्गत आज मुंब्रा प्रभाग समिती समितीमध्ये एकूण १५ हजार, ५०० रुपये रुपये दंड व ११ किलो प्लास्टीक जप्त, तर वागळे प्रभाग समितीमध्ये एकूण १० हजार, ५०० रुपये दंड व १३ किलो प्लास्टीक जप्त करून रुपये १० हजार रुपयांच्या दंडात्मक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सदरची कारवाई प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदूषण नियंत्रण विभाग व प्रभाग समिती स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांनी केली.