ठाणे : पावसाळ्यात महापालिकेसह सर्व यंत्रणांचे समन्वयक अधिकारी कायम उपलब्ध हवेत. त्यांचे मोबाईल बंद असू नयेत, नेटवर्कमध्ये नाही, रेंज नाही, मोबाईल चार्जिंग संपले अशा कोणत्याही सबबी सांगू नयेत. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी २४ तास आणि सातही दिवस उपलब्ध असणे अपेक्षित आहे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
आपत्कालीन व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणांची मान्सून पूर्व आढावा बैठक ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात नुकतीच झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर होते.
रस्त्यावरील गटाराच्या चेंबरचे झाकण नसल्याने कोणतीही दुर्घटना झाली तर गंभीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त श्री. बांगर यांनी दिला रेल्वे मार्ग सुरळीत राहण्यासाठी मुलुंड ते दिवा या पट्ट्यातील सर्व नाल्यांची काळजीपूर्वक सफाई केली जावी, अशी सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी केली. नौपाडा आणि कोपरी येथे रेल्वे रुळांवर पाणी येऊ नये म्हणून पट्ट्या टाकल्या जातात, त्यामुळे पाणी तेथे अडून माघारी येते. त्यामुळे, पाणी नियमित वाहत असेल तेव्हा पट्टी टाकली जावू नये, असे ठाणे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
वाघोबा नगर, भास्कर नगर येथील अतिक्रमणामुळे रस्ता खचला आहे. कुपण भिंतीच्या वर असलेली बांधकामे रेल्वेसाठी धोकादायक ठरू शकतील. या भागाची पाहणी करून योग्य तो उपाय करावा असे निर्देश आयुक्तांनी दिले. पारसिक बोगद्यावरील काही झाडेही धोकादायक झाली आहेत, तर रेल्वे लगतच्या इमारतींमधील सुमारे ७२ झाडांच्या फांद्या रुळांवर येत आहेत, त्यांची छाटणी लवकर व्हावी, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उद्यान विभागाने हे काम प्राधान्याने करावे, असे आयुक्तांनी सांगितले.
शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामासाठी केलेले बॅरिकेडींग आवश्यक तेवढेच ठेवा. म्हणजे वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल, असे आयुक्त श्री. बांगर म्हणाले. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील मॉडेला नाका चौक ते तीन हात नाका येथील बॅरीकेडींग किमान दोन फुटाने कमी केले तर तिथे कोंडी होणार नाही, असेही आयुक्त म्हणाले.
धोकादायक पोल, उघड्या वीज वाहिन्या, डीपी यांची पाहणी करून योग्य ती देखभाल दुरुस्ती केली जावी. नाले सफाई, रस्त्याची कामे यावेळी तेथे महावितरणचा स्थानिक अधिकारी हजर राहील, असे पहावे, असेही आयुक्त म्हणाले. कौसा, शीळ, डायघर, दिवा या भागात मातीची भरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे पाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद होत आहेत. या भागात नाले काढण्यासाठी स्थानिक विरोध करतात. तेथे तहसीलदारांनी हस्तक्षेप करून नाल्यांसाठी मार्ग काढून द्यावा, असे आयुक्त श्री. बांगर म्हणाले. तसेच, मुंब्रा, दिवा, कोपर येथे मातीचे उत्खनन सुरू असल्याने भविष्यात रेल्वे मार्गावर धोका होऊ शकतो, याची महसूल विभागाने नोंद घ्यावी, असेही आयुक्तांनी सांगितले.
ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापनाने आयोजित केलेल्या या बैठकीस, अतिरीक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उपायुक्त जी. जी. गोदेपूरे, महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत, ठाणे जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी, पोलीस आयुक्तांचे प्रतिनिधी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मध्य रेल्वेचे अधिकारी, महावितरण, आरटीओ, एस टी, टी एम टी, महानगर टेलिफोन निगम, एमआयडीसी, मुंबई मेट्रो, टोरंट वीज कंपनी, महानगर गॅस, इंडीयन रेडक्रॉस, लायन्स क्लब तसेच महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.