ठाण्यात ४७ अतिधोकादायक इमारतींमध्ये २३५ कुटुंबे

ठाणे : पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता असते. मुंबईत नुकत्याच झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात ४७ अतिधोकादायक इमारतींमध्ये २३५ कुटुंबे वास्तव्य करत असून पालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे.

ठाणे महापालिका हद्दीत ६७ इमारती अतिधोकादायक असून त्यातील २० इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. उर्वरित ४७ इमारती रिकाम्या करुन त्या पाडण्याची कारवाई पालिकेकडून केली जाणार आहे. मात्र रहिवासी इमारती खाली करत नसून अजूनही या इमारतींमध्ये २३५ कुटुंबांचे वास्तव्य आहे. या रहिवाशांना बाहेर कसे काढायचे असा प्रश्न पालिकेपुढे उभा राहिला आहे

धोकादायक इमारतींमध्ये ४,३३० इमारतींचा समावेश आहे. त्यातील काही इमारती या दुरुस्त होऊ शकणाऱ्या असल्याने त्यात राहण्याची परवानगी पालिकेने दिलेली आहे. मात्र पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक इमारती रिकाम्या करुन त्यातील कुटुंबांना महापालिका शाळांमध्ये तात्पुरता निवारा देण्याची पालिकेची तयारी आहे. त्यासाठी महापालिकेकडून यंदा ११६ शाळा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

मागील आठवड्यात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने घेतलेल्या मोहिमेत अतिधोकादायक इमारतींची पाहणी करण्यात आली होती. त्यातील २० इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. आता पुन्हा शनिवारी आणि रविवारी मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यातील रहिवाशांना पुन्हा एकदा इमारती खाली करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण उपायुक्त गजानन गोदापुरे यांनी दिली आहे. या इमारत धारकांना इमारती रिकाम्या करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. तरी देखील रहिवाशी इमारती खाली करण्यास तयार नसल्याचेच दिसत आहे.