ठाण्यात कोरोनाचे नवीन २३ रुग्ण

ठाणे: शहरातील कोरोना रुग्णांची वाढ वेगाने होत असून आज २३ नवीन रुग्णांची भर पडली तर १६ जण रोगमुक्त झाले आहेत.

महापालिका हद्दीत हळूहळू रूग्णवाढ वेग घेत आहे. रुग्णालयात सात आणि घरी १०७ असे ११४ सक्रिय रूग्ण ठाण्यात आहेत. रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी १६जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१,८२३जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २,१३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील ६०८ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये २३जण बाधित सापडले. आत्तापर्यंत २४ लाख २४,५७९ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८४,०६७ रूग्ण बाधित मिळाले आहेत.