सात अट्टल गुहेगारांकडून 23 गुन्ह्यांची उकल

भिवंडी: भिवंडी पोलिसांनी दमदार कामगिरी करत सात अट्टल गुन्हेगारांना बेड्या ठोकून त्यांनी केलेल्या 23 गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळाले आहे. या अटक केलेल्या गुन्हेगारांकडून लाखोंचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. याच गुन्हेगारांकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता भिवंडीचे पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांनी व्यक्त केली आहे.

भिवंडी शहरात वाहन चोरीच्या गुन्ह्यासह मोबाईल आणि घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने पोलीस उपआयुक्त ढवळे यांनी हद्दीतील सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना या गुन्ह्याला आळा घालण्याचे सक्त आदेश दिले होते. त्यानुसार शांतीनगर पोलिसांच्या पथकाने शिताफीने शोध घेऊन वाहने चोरी करणाऱ्या त्रिकुटाला बेड्या ठोकल्या आहेत. बिलाल अन्सारी (27) रा. मालेगाव, मोहम्मद सैफ खान (24) शांतीनगर भिवंडी, राहील अन्सारी (26) रा. गौबीनगर भिवंडी असे वाहने चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे भिवंडीतील दोन आरोपी हे शहरातील दुचाक्यांसह रिक्षांची चोरी करुन मालेगाव भागात विक्री करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले.

या गुन्हेगार त्रिकूटाकडून 19 वाहन चोरीचे गुन्हे आतापर्यंत उघडकीस आले असून या गुन्ह्यात आणखी काही आरोपी असल्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे. या तीन गुन्हेगारांपैकी बिलाल याला तांत्रिक आणि बातमीदारच्या आधारे मालेगावातून सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र म्हात्रे, संतोष तपासे, पोलीस हवालदार रविंद्र चौधरी, महेश चौधरी, रिजवान सैयद, पोलीस नाईक किरण जाधव, श्रीकांत पाटील, किरण मोहिते, पोलीस शिपाई रविंद्र पाटील, नरसिंह क्षीरसागर, दीपक सानप, मनोज मुके, तौफिक शिकलगार, विजय ताटे या पोलीस पथकाने सापळा रचून अटक केली. त्यानंतर त्याने वाहने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याचे भिवंडीत राहणाऱ्या दोन साथीदारांचा शोध घेऊन त्यांनाही अटक केली.

या अटक गुन्हेगारांकडून 14 दुचाक्या, चार रिक्षा अशी 18 वाहने आतापर्यंत जप्त करण्यात आली आहेत. या गुन्हेगारांनी शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 वाहने चोरी केल्याचे समोर आले असून यापूर्वीही शांतीनगर पोलीस पथकाने 19 वाहन चोरीचे गुन्हे उघकीस आणले असून एकूण 38 वाहन चोरीचे गुन्हे महिन्याभरात उघडकीस आणले आहेत. या अटक गुन्हेगारांकडून सात लाख 90 हजार रुपये किंमतीचे वाहने आतापर्यंत जप्त करण्यात आली आहेत.