शहापूर: किन्हवलीजवळील शिळ गावात एकाच कुटुंबातील 22 जणांना अन्नातून विषबाधा झाली असून पुढील उपचारासाठी त्यापैकी 21 जणांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात व एका व्यक्तीला ठाणे येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रक्षा विसर्जनाच्या दिवशी सकाळी तयार केलेले अन्न संध्याकाळीही खाल्ल्याने 28 मे रोजी हा विषबाधेचा प्रकार समोर आला.
मंदा भोईर (36), हरि भगत (50), अलका भगत (45), गिता भोईर (40), प्रिया भोईर (17), अनुष्का अशोक भोईर (11), सुभाष भोईर (53), मयूर भोईर (22), नितीन भोईर (24), हरि भोईर (64), कविता शिंगोळे (42), राजश्री भोईर (46), गणेश भोईर (17), बाळू भोईर (80), सुमन भोईर (42), मंदा भोईर (51), भानुदास भोईर (51), कल्पेश भोईर (24), भालचंद्र भोईर (51), अशोक भोईर (52), अनंता भोईर( 60) आणि अक्षता भोईर (17) अशी विषबाधा झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
किन्हवली परिसरात शिळ या गावातील अशोक भोईर यांच्या मातोश्री बारकाबाई भोईर यांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी (दि. 27) रक्षा विसर्जनाचा विधी आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित नातेवाईक पाहुण्यांसाठी जेवण बनवण्यात आले होते. त्यातील शिल्लक राहिलेले जेवण रात्री कुटुंबातील सर्वांनी खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या, मळमळ, जुलाब, पोटदुखी, ताप असा त्रास होऊ लागला. रात्री नऊच्या सुमारास 22 जणांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तेथून पुढे 21 व्यक्तींना शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात व हरि भोईर यांना सिव्हिल रुग्णालय ठाणे येथे हलविण्यात आले असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान शहापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी.एच.राठोड यांनी शुक्रवारी (दि.29) सकाळी रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.