पुण्यात दारुकांड

* विषबाधेने १३ जणांचा मृत्यू
* आठ आरोपींना अटक

पुणे: पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे सुरू झालेले मृत्यूचे तांडव थांबत नसून सारे शहरच हादरून गेले आहे. जास्त नफ्याच्या इराद्याने दारूत अति प्रमाणात मिथेनॉल मिसळल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये आठ तर पुण्यात पाच जणांचा अशा एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. मात्र स्थानिकांच्या मते मृत्यूचा आकडा यापेक्षा जास्त असल्याचे कळते.

एकामागून एक सुरू असलेल्या मृत्यूसत्रामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आनंदवन, काटेवस्ती, संजयनगर, आझाद चौक आणि जय महाराष्ट्र चौक या परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण आहे. या दारुकांडाची व्याप्ती आता समोर येऊ लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरळी कांचनमधील राधेशाम प्रजापती (३५) हा दारु तयार करण्याचे काम करतो. योगेश वानखेडे (२३) हा प्रजापतीकडून दारु खरेदी करुन पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वेगवेगळ्या दारु गुत्त्यांवर विक्री करतो. योगेश वानखेडे हा दारु विक्री करणारा सराईत गुन्हेगार आहे. मात्र यावेळी योगेश‌ वानखेडेने प्रजापतीकडून दारु खरेदी केल्यानंतर अधिक नफा कमावण्याच्या उद्देशाने त्यामधे मिथेनॉल मिसळले. मिथेनॉलमुळे दारुचे प्रमाण दुप्पट झाले, ज्यामुळे वानखेडेचा नफा वाढणार होता. मात्र यावेळी मिथेनॉल नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात मिसळले गेले आणि ती दारु विषारी बनली, आणि अनेकांचा जीव घेणारी ठरली.

वानखेडेने ती दारु पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीत दारु गुत्ता चालवणाऱ्या कर्नलसिंह विरखा आणि गुरमितसिंह विरखा या बापलेकांना विकली. अनेकांच्या मृत्युला हा गुत्ता कारणीभुत ठरला. योगेश‌ वानखेडेने त्याच्याकडील दारूच पुण्याच्या खडकी भागातील कल्पेश अग्रवाल आणि पुण्यातील वडारवाडी भागातील अरिहंत धोत्रे यांना देखील विकली. त्याचबरोबर पुण्याच्या हडपसर आणि काळेपडळ भागात दारु गुत्ता चालवणाऱ्या आकाश जाधव आणि अशोक हांडे यांना विकली, ज्यामुळे हडपसर भागात देखील मृत्यू झाले. पिंपरी-चिंचवडमधे आठ तर पुण्यात पाच अशा एकुण १३ मृत्युंची नोंद झाली आहे. मात्र स्थानिकांच्या मते मृत्युचा आकडा कितीतरी जास्त आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सहा तर पुणे पोलिसांनी दोन अशा एकुण आठ आरोपींना अटक केली आहे. योगेश वाशखेडे, राधेशाम प्रजापती, कर्नलसिंह विरखा, गुरमितसिंह विरखा, कल्पेश अग्रवाल, अरिहंत धोत्रे, आकाश जाधव आणि अशोक हांडे अशी आरोपींची नावे आहेत. उरळी कांचन हे पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येते. त्यामुळे ही घटना पुणे ग्रामीण पोलीस, पुणे शहर पोलीस आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस या तिघांचे अपयश मानले जात आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात माझे पुणे पोलीस आयुक्तांशी बोलणे झाले आहे. कुठल्या ठिकाणी विषारी दारू तयार झाली हे पोलिसांनी शोधून काढलेले आहे. याच्या पाठीमागे जे काही लोक आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणखी काही लोक यात असू शकतात. ते शोधण्याचे काम सध्या सुरू आहे. ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना उपचार करून वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही घटना अत्यंत गंभीर आहे. ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालं त्याच्या पाठीमागे कोण-कोण आहेत हे पोलीस शोधून काढत आहेत. आतापर्यंत आठ लोकांना अटक झाली आहे. अजून काही लोकांना अटक होऊ शकते. या प्रकरणातील संपूर्ण साखळी शोधून त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कारण ही एक प्रकारे हत्याच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.