पडघा : मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे गावच्या हद्दीतील रिचलँड कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलास सोमवारी पहाटे भीषण आग लागली. या गोदाम संकुलातील २२ गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या गोदामात कपडे, बूट, केमिकल, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवले होते.
या आगीत गोदामात साठवलेला कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. आगीची माहिती मिळताच भिवंडीसह कल्याण येथील प्रत्येकी दोन अशा चार अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू केले. परंतु पाण्याची कमतरता असल्याने आग विझवण्यात अग्निशामक दलास अडचण येत होती. गोदामात केमिकल ठेवले असल्याने केमिकल गोदामातील आग विझवण्यासाठी फोमचा वापर करण्यात आला.
आगीचे कारण अजून अस्पष्ट असून, मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रिचलँड कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलात के के इंडिया पेट्रोलियम स्पेसियालिटीज, कॅनन इंडिया, ब्राईट लाईफकेअर, होलीसोल, एबॉट हेल्थकेअर या कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात केमिकल, प्रिंटिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक साहित्य, प्रोटीन खाद्यपदार्थ पावडर, कॉस्मेटिक साहित्य, कपडे, बूट,मंडप डेकोरेशन साहित्य व फर्निचर साठवण्यात आले होते. तब्बल नऊ तासांनी या आगीवर अग्निशामक दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळविले.