कडोंमपा क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी २२ कोटींचा निधी

कल्याण: राज्याच्या नगरविकास विभागाकडून कल्याण-डोंबिवली महापालिकेला डोंबिवली शहरात विविध मूलभूत सोयी सुविधा उभारण्यासाठी २२ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

डोंबिवली शहरात विविध ठिकाणी रस्त्यांचे काँक्रीटीकरण, जिल्हा परिषद शाळा नूतनीकरण, अभ्यासिका उभारणी, स्मशानभूमी, समाज मंदिर, बॅडमिंटन कोर्ट, मैदान, यांसारख्या विविध विकासकामे करण्यात येणार आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवली क्षेत्रात मागील काही वर्षात विविध पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. रस्त्यांची उभारणी, सांस्कृतिक भवन, क्रीडा संकुले, ऐतिहासिक मंदिरांचा पुनर्विकास यांसारखी अनेक कामे गेल्या काही वर्षांच्या कालावधीत मतदारसंघात पूर्णत्वास गेली आहे.

सद्यस्थितीत कोट्यवधी रुपयांची विकासकामे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सुरू आहे. या कामांच्या पूर्णत्वासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत सातत्याने पाठपुरावा होता. याच पद्धतीने शहरात इतरही पायाभूत सुविधा उभारणीसाठी भरीव निधीची तरतूद व्हावी खासदार डॉ.शिंदे प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्याच्या नगरविकास विभागाकडून कल्याण आणि डोंबिवली शहरात विविध पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी २२.१५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

डोंबिवली पूर्व येथील जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण, अंबिका नगर परिसरातील पोहोच रस्ता कॉंक्रिटीकरण, काटई येथील स्मशानभूमी, तलावाजवळ गणेश घाट, गोळवली येथे कमानी व स्मशानभूमी समाज हॉल, आयरेगाव येथे स्मशानभूमीचे नूतनीकरण, सुनील नगर येथे बॅडमिंटन कोर्ट, निळजे येथे मैदान विकसित, हरीजन वसाहत येथे शौचालय दुरुस्ती, तसेच विविध ठिकाणी पथदिवे लावणे, उद्यानाचे सुशोभीकरण करणे, कल्याण मधील आडीवली, नांदीवली, चिंचपाडा येथे तलाव, तसेच शहरातील विविध बागांचे नूतनीकरण करणे, रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे यांसारखी कामे केली जाणार आहेत.