दहा वर्षांनंतरही वसूल होईना २१३ कोटींची थकबाकी

यंदा मालमत्ता कर वसुलीत २३ कोटींची वाढ

ठाणे : ठाणे महापालिकेच्या मालमत्ता विभागाची वसुली समाधानकारक असली तरी,अद्याप २१२ कोटींची दहा वर्षे जुनी थकबाकी पालिकेच्या तिजोरीत जमा झालेली नाही. ही वसुली करण्याचे मोठे आव्हान पालिकेच्या मालमत्ता विभागासमोर आहे. दरम्यान यंदा २३ कोटींची अधिक वसुली विभागाने केली आहे.

मालमत्ता कर विभागाने महापालिकेला मागील दोन वर्षे सावरल्याचे चित्र आहे. परंतु मागील वर्षी ५०० चौरस फुटांच्या घरांवरील सामान्य कर माफ करण्यात आल्याने वसुलीवर परिणाम होईल असे चित्र होते. परंतु तरी देखील या विभागाने विक्रमी वसुली केली होती.

यंदा देखील या विभागाला जवळ जवळ ७५० कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. या उद्दीष्टानुसार चार महिन्यात ४१ टक्के वसुली करण्यात या विभागाला यश आले आहे. २७ जुलैअखेर या विभागाने वसुलीपोटी ३३५.०१ कोटी मिळविले आहेत. मागील वर्षी याच दिवशी ही वसुली ३१२ कोटी इतकी होती. त्यात यंदा २३ कोटींची वाढ झाल्याचे दिसत आहे. ही वसुली समाधानकारक असली तरी देखील महापालिकेला थकबाकीदारांचे टेन्शन आले आहे. थकबाकीदारांनी मालमत्ता करापोटी २१२ कोटी थकविले असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली. थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी महापालिका विविध स्वरुपाचे प्रयत्न करीत आहे. अगदी ९० दिवसानंतर कारवाईला सुरवात देखील होते. परंतु तरी देखील मागील १० वर्षापासूनची थकबाकी असल्याचे दिसून आले आहे.