संस्कृति युवा प्रतिष्ठान, प्रताप सरनाईक फाउंडेशनकडून दहीहंडी होणार जल्लोषात
ठाणे : संस्कृति युवा प्रतिष्ठान, प्रताप सरनाईक फाउंडेशन व शिवसेना यांच्यातर्फे यंदा भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन ठाण्यात करण्यात आले आहे. आज त्याबाबत आमदार सरनाईक आणि युवा सेना सचिव पूर्वेश सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. सुरक्षेचे सर्व नियम पालन करुन हा उत्सव होणार असून दहीहंडीचा विश्वविक्रम मोडणाऱ्या पथकास २१ लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.
या दहिहंडी उत्सवात येणाऱ्या प्रत्येक पथकाला थरांप्रमाणे बक्षिस दिले जाईल. आयोजकांनी जास्तीत जास्त प्रमाणात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करावे व बक्षिसे जाहीर करावीत, जेणेकरून अधिकाधिक गोविंदा पथके यात सहभागी होतील. जी बक्षिसे मिळतात त्यातून सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम वर्षभर होतात त्यामुळे दहीहंडी पथकांना रोख बक्षिसे देऊन प्रोत्साहित करणे गरजेचे आहे, असे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.
यंदा दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी राज्य सरकारने ज़ाहिर केली असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार सरनाईक यांनी आभार मानले आहेत.
दहीहंडीचा समावेश क्रीड़ा प्रकारात करा-सरनाईक
दहीहंडी या खेळाचा क्रीड़ा प्रकारात राज्य सरकारने समावेश करावा अशी मागणीही आमदार सरनाईक यांनी केली आहे. स्पेन देशात मानवी मनोरे रचणे हा खेळ खेळला जातो आणि त्यांचे खेळाडू जगभर त्यासाठी फिरतात. स्पेनपेक्षा चांगले मानवी मनोरे आपली गोविंदा पथके रचतात त्यामुळेच त्यांना क्रीडा प्रकारात अधिकृत समावेश करुन खेळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी आमदार सरनाईक यांनी केली आहे. दहीहंडीचा समावेश क्रीडा प्रकारात केल्यास गोविंदाच्या दृष्टीने तो निर्णय अतिशय प्रभावी होईल, क्रीड़ा प्रकारात दहीहंडी समाविष्ट झाल्यास शासकीय नोकऱ्यांमध्येही गोविंदांना आरक्षण मिळू शकेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोविंदांना ही अनोखी भेट देतील, असा विश्वास आमदार सरनाईक यांनी व्यक्त केला.