मीरा-भाईंदर महापालिकेचे २०९५ कोटींचे अंदाजपत्रक सादर

भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिकेचा सन २०२५-२६ चे २६९४ कोटी ८९ लक्ष रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्या हस्ते वित्तीय वर्ष २०२५-२०२६ चे मूळ आणि २०२४-२०२५ चे सुधारित अंदाजपत्रक सादर करण्यात आले.

सन २०२५-२०२६ चे अंदाजपत्रक रू. २६९४ कोटी ८९ लाख इतके आहे. नागरिकांच्या सोयी-सुविधांवर लक्ष केंद्रित करून कोणत्याही प्रकारचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.

मागील अंदाजपत्रक २२९७ कोटी ९४ लक्ष रुपयांचे होते. यंदाचे अंदाजपत्रक २६९४ कोटी ८९लक्ष एवढे आहे. २०२५-२६मध्ये मालमत्ता कर व फीपासून ३९८ कोटीचे उत्पन्न
अपेक्षित केले आहे. यामध्ये प्रामुख्याने विकास आकारणी १९५ कोटी, जीएसटी अनुदान ३९२ कोटी ४८ लक्ष, मुद्रांक शुल्क अनुदान ६१ कोटी उत्पन्न प्राप्त होणार आहे.

सिमेंट काँक्रीट रस्ते बांधणीसाठी सन २०२४-२५ मध्ये १०० कोटी कर्ज व २०२५-२६ मध्ये ४००कोटी कर्ज घेण्याचे प्रस्तावित आहे.

सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ५१६ कोटी खर्च असून सदर कामे प्रगतीपथावर आहेत. सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी १३१ कोटींची तरतुद केली आहे.

घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत वाॅर्ड सफाईसाठी १७० कोटी व नालेसफाईसाठी चार कोटींची तरतूद केली आहे. वैद्यकीय आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ८० कोटी ९१ लक्ष रुपये तरतूद केली आहे. उद्यान विभागाकरिता ५४ कोटींची तर समाजविकास व क्रिडा विभागासाठी १२ कोटी ८७ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त डॉ. सचिन बांगर, उपायुक्त (मुख्यालय) कल्पिता पिंपळे, उपायुक्त प्रसाद शिंगटे, मुख्य लेखाधिकारी तथा वित्त अधिकारी कालिदास जाधव, नगरसचिव वासुदेव शिरवळकर, शहर अभियंता दिपक खांबित, कार्यकारी अभियंता शरद नानेगांवकर, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, सहाय्यक संचालक नगररचना पुरुषोत्तम शिंदे, सिस्टम मॅनेजर राजकुमार घरत, माहिती व जनसंपर्क अधिकारी जितेंद्र कांबळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी प्रमोद पडवळ व महापालिका अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.