ठाण्यात पुन्हा २०१७चा पॅटर्न; निवडणुकीत चार सदस्य पॅनल

* महाविकास आघाडीला दणका
* शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

ठाणे : मागील महाविकास आघाडी सरकारने मुंबई-ठाणेसह मोठ्या महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी प्रभाग रचनेत पाहिजे तसा बदल करून घेतला होता. सत्ता परिवर्तन होताच भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने २०१७ची प्रभाग रचना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ठाण्यात आता चार सदस्यीय पॅनल येणार आहे. परिणामी नव्याने प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याने निवडणुका आणखी पुढे जाणार आहेत.

बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या नवीन निर्णयानुसार लोकसंख्येनुसार पुन्हा नव्याने प्रभागरचना बदलणार असून एक सदस्य वाढण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यानुसार ठाणे महापालिकेची आगामी निवडणूक त्रिसदस्य न होता २०१७ सालच्या पॅटर्ननुसार चार सदस्य पॅनलपद्धतीने होण्याची शक्यता आहे. म्हणजे नुकतीच ३२ ते ३८ हजार लोकसंख्या ग्राह्य धरून केलेली प्रभाग रचना ४० हजार लोकसंख्येनुसार वाढणार आहे. मात्र त्यामुळे नगरसेवकांच्या संख्येत कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे.

ठाणे महापालिकेची मुदत संपून आज पाच महिने पूर्ण झाले असून संपूर्ण कारभार प्रशासकाच्या हाती आहे. हा अवधी आणखी वाढू नये यासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहिर केला. सर्वप्रथम एक पॅनल पद्धतीने निवडणूक घेण्याच्या सुचना करण्यात आल्या. पण त्याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता असल्याने  तत्कालीन ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत २००२ सालच्या पॅटर्ननुसार त्रिसदस्य पॅनल पद्धतीने निवडणूका घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार निवडणूक आयोगही कामाला लागले.

दिलेल्या कार्यक्रमानुसार प्रभाग रचना, आरक्षण सोडत, मतदार याद्या असे सर्व सोपस्कार पार पडल्याने लवकरच निवडणुकांचा धुरळा उडेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र राज्यात पुन्हा सत्तापरिवर्तन झाल्याने आता महापालिकांच्या निवडणुकांचे गणित बदलणार आहे. शिवसेनेत पडलेल्या दोन गटांमुळेच ही राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे.
बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये लोकसंख्येनुसार सदस्य संख्येत सुधारणा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सहा लाख ते ३० लाख लोकसंख्येनुसार ही सदस्य संख्या ठरवण्यात आली आहे. यामध्ये १२ ते २४ लाख लोकसंख्या असलेल्या महापालिकेमध्ये ४० हजार लोकसंख्येचा एक प्रभाग बनणार आहे. यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या १८ लाख इतकी ग्राह्य धरून सध्या प्रभाग रचना बनवण्यात आली होती. यावेळी ३२ ते ३८  हजार लोकसंख्येचा एक प्रभाग आणि तीन सदस्यांचा पॅनल अशी रचना करण्यात आली हाती. ती आता नवीन सुचनेनुसार ४० हजार लोकसंख्येचा एक प्रभाग आणि एक सदस्य वाढीमुळे चार सदस्यांचा पॅनल अशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याविषयी अद्याप मंत्रीमंडळाने सविस्तर स्पष्टीकरण दिले नसले तरी जाणकारांच्या मते २०१७ प्रमाणेच चार सदस्य पॅनलनुसार या निवडणुका होण्याची शकयता आहे.

पॅनलचा खेळ

२००२- त्रिसदस्य, २००७- एक सदस्य, २०१२- दोन सदस्य (५० टक्के राखीव), २०१७- चार सदस्य

निम्मा प्रभाग महिलांसाठी राखीव

त्रिसदस्य पद्धतीमध्ये निम्म्या प्रभागांमध्ये दोन महिला तर निम्म्या प्रभागामध्ये एक महिला सदस्य निवडून येणार होत्या. पण चार सदस्य पॅनलनुसार निवडणूक झाल्यास प्रत्येक प्रभागात निम्मे आरक्षण महिलांसाठी असणार आहे.

चार पॅनल पद्धतीने निवडणुका घेतल्यास आताच सोपस्कार झालेल्या  प्रभाग रचना, आरक्षणामध्ये बदल करावा लागणार आहे. त्यासाठी पुन्हा नव्याने कार्यक्रम आखण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच लांबलेली पालिका निवडणूक आणखी पुढे ढकलण्याची शक्यता वाढली आहे.

प्रभाग संख्या घटणार
तीन जणांच्या पॅनलनुसार सध्या 47 प्रभागांची रचना करण्यात आली होती. आता चार सदस्यांचा एक प्रभाग केल्यास प्रभागाची सीमा रचना वाढणार असून संख्या कमी होण्याची शक्यता आहे. ठाण्याची लोकसंख्या १८ लाख ग्राह्य धरल्यास आणि चाळीस हजार लोकसंख्येचा एक प्रभाग, चार सदस्य असे गणित मांडल्यास ७ ते ८ प्रभाग कमी होण्याची शक्यता आहे.