ठाण्यातील २०० सुशिक्षित जोडपे लकी ड्रॉच्या जाळयात

ठाणे: ट्रॅव्हलिंग हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेसच्या नावाखाली देश-विदेशात फिरण्याची संधी देण्याचे आमिष दाखवून एका दुकलीने ठाण्यातील सुमारे २०० जोडप्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

सुरुवातीला या प्रकरणी एका जोडप्याने गेल्या महिन्यात श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. हे जोडपे मॉलमध्ये फिरण्यासाठी गेले असता तिथे त्यांच्याकडून लकी ड्रॉ भरून घेण्यात आला होता. त्यानंतर त्यांना वागळे इस्टेट येथील कंपनीच्या कार्यालयात बोलवण्यात आले.

बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून रजिस्ट्रेशनसाठी सुमारे १ लाख ३५ हजार रुपये ऑनलाईन फी घेण्यात आली. पण जेव्हा समोरच्या कंपनीकडून फसवणूक झाल्याचे कळले तेव्हा या उच्चशिक्षित जोडप्याने पोलिस ठण्यात धाव घेतली. इतकेच नव्हे तर जवळच्या एका बँक कर्मचार्‍याच्या मदतीने फसवल्या गेलेल्या लोकांचे मोबाईल नंबर मिळवून त्यांचा एक व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप तयार केला. एक-एक करत यामध्ये २०० हून अधिक फसवल्या गेलेल्यांची नावे जोडली गेली. कुणाकडून दीड लाख तर कुणाकडून अडीच लाखांची रक्कम उकळली गेली असल्याचे त्यावेळी समोर आले.

या प्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण काबाडी आणि त्यांच्या पथकाने मुंबई, पुण्यातून आरोपी अख्तर शेख आणि शैलेंद्र काळे या दुकलीला ५ डिसेंबरला अटक केली आहे. ते अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्या चौकशीत शैलेंद्र काळे हा आधी रिलायन्स कंपनीत कामाला होता. त्यांनतर त्याने वर्षभरापूर्वी कार्लन क्राऊन ही कंपनी सुरू केली. परदेशी सहल घडवणारी ही कंपनी नोंदणीकृत आहे. तर ज्यांच्यासोबत त्यांनी व्यवहार केले आहेत, त्याचा रितसर करार केलेला आहे. पण कंपनी घाट्यात गेल्याचे सांगून या दुकलीने आता हात वर केले आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्यांचे लाखो रुपये परत कसे मिळतील हा प्रश्न उपस्थित होत आहे.

आम्ही उच्चशिक्षित असूनही फसवलो गेला. आमच्यासारखे दोनशेहून अधिक जणांची यादी सध्या आमच्याकडे आहे. पण ही संख्या हजारांच्या घरातही असू शकते. त्यामुळे लकी ड्रॉच्या नावाने कोट्यवधी रुपयांची ही फसवणूक आहे. पोलिसांनी योग्य तपास केल्यास हा घोटाळा उघडकीस येईल. यासाठी आम्ही लढा पुकारला असून न्याय मिळेपर्यंत असाच सुरू राहिल असे फसवणूक झालेल्या सिद्धी शिंदे यांनी सांगितले.

गुन्ह्याची मोडस ऑपरेंडीग
दुपारच्या सत्रात विंग बडीज तर सायंकाळी कार्लटन क्राऊन या नावाने या कंपनीची माणसे विविध मॉलमध्ये फिरायची. लकी ड्रॉ भरून घेत परदेशात फिरण्याचे आमिष दाखवले जात असे. त्याअंतर्गत कंपनी मार्फत ८९ हजारांचे पॅकेजमध्ये डिसेंबर महिना वगळुन ०३ वर्षांमध्ये भारतात कुठेही एकुण २१ दिवस हॉटेलमधील वास्तव्य व एकावेळचे जेवण मोफत, प्रत्येक दिवसाचे फक्त ०१ हजार रूपये भरावे लागतील तसेच १ लाख ३५ हजार रुपयांमध्ये वरीलप्रमाणेच स्कीम सांगितली जायची. यामध्ये भारतात व भारताबाहेर (युरोप वगळून) एकूण ३५ दिवस जाऊ शकता तसेच भारताबाहेर जाताना विमानाचे तिकीट कंपनीतर्फे असेल असे देश विदेशात फिरण्याची संथी मिळेल असे सांगून लोकांना आकर्षित केले जायचे. त्यासाठी जोडप्यांना सावज केले जायचे. जोडप्यांनी हे कुपन भरल्यानंतर त्यांना कंपनीच्या पत्त्यावर बोलावून त्यांचेकडून रोख रक्कम स्विकारली जात होती.