२० लाखांचा गांजा जप्त

ठाणे: गस्तीवरील चितळसर पोलिसांनी ११ जानेवारी रोजी पोखरण रोड २ येथील सुभाषनगर येथे संशयास्पदरित्या आढळून आलेल्या स्विफ्ट डिझायर कारमधून तब्बल २० लाख १० हजार रुपयांचा गांजा जप्त केला.

हवालदार पाटील आणि पोलीस शिपाई साळुंके हे पेट्रोलिंग करत असताना सकाळी पाचच्या सुमारास सुभाषनगर येथे संशयास्पदरित्या उभी असलेली एक पांढ-या रंगाची मारुती कंपनीची स्विफ्ट डिझायर कार दिसली. कारच्या बाजूला दोन व्यक्ती येऊन कार चालकाशी बोलत होत्या. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता दोन व्यक्ती पळून गेल्या तर कारचालक उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

हवालदार पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री.सांगळे आणि त्यांच्या टीमला तसेच आणि अंमलदार पोलीस उपनिरीक्षक विजय हिंगे यांना फोन करून बोलावले अधिक चौकशीत चालकाचे नाव रोहितकुमार पटेल (24) रा. वर्तकनगर, ठाणे असल्याचे कळले.

गाडीची डिक्की उघडली असता त्यात प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये गांजा आढळून आला. याची किंमत २० लाख १० हजार रुपये एवढी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी वाहनांसह गांजा असा २८ लाख दहा हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस पोलीस आयुक्त आशुतोष डुंगरे यांच्यासह, सह-पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण अतिरिक्त आयुक्त पश्चिम प्रा.विभाग विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त वर्तकनगर विभाग मंदार जवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली चितळसर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रशांत सांगळे, उपनिरीक्षक पंकज लहाणे, उपनिरीक्षक विजय इंगळे, हवालदार सुरेश पाटील, हवालदार अभिजीत कलगुटकर, हवालदार अभिषेक सावंत आणि संतोष चौगुले, हवालदार प्रमोद गावडे आदींनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सांगळे करत आहेत.