अंबरनाथमधील साहित्य उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी हवेत पावणे दोन कोटी

उद्यानातील दुरवस्थेमुळे साहित्यिकांत नाराजीची भावना

अंबरनाथ : दहा वर्षांपूर्वी अंबरनाथला सुरु करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या साहित्य उद्यानात सुविधा पुरवण्यासाठी एक कोटी ७५ लाख रुपये निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केली आहे.

अंबरनाथमध्ये कवी किरण येले आणि माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील पहिले पद्मश्री मधु मंगेश कर्णिक साहित्य उद्यान सुरु करण्यात आले होते. राज्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते २६ जानेवारी २०१५ साली कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते रामदास फुटाणे, डॉ. महेश केळुस्कर, संभाजी भगत, अशोक नायगावकर आदी कवी साहित्यिकांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन सोहोळा पार पडला होता.

गेल्या काही वर्षांत उद्यानात जिल्हास्तरीय साहित्य संमेलन, कवी संमेलने, व्याख्याने, हिंदी साहित्य संमेलन, मान्यवरांच्या मुलाखती, वर्षा ऋतू संमेलन, दिवाळी पहाट यासारखे दर्जेदार उपक्रमांना अंबरनाथवासियांची भरभरून दाद मिळाली होती.

अंबरनाथमधील हुतात्मा चौकात सहा हजार चौरस फुटाच्या विस्तीर्ण जागेतील उद्यानात ८० विविध कवी, साहित्यिक यांची त्यांच्या छायाचित्रासह माहिती पहावयास मिळते. दिमाखदार आणि कल्पकतापूर्ण संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या साहित्य उद्यानाचे सर्वत्र कौतुक केले होते. मात्र काही वर्षांपासून नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने उद्यानाची सध्या दुरावस्था झाल्याने साहित्यिकांमध्ये नाराजीची भावना उमटल्याची खंत चौधरी यांनी व्यक्त केली.

भविष्यात उद्यानात लोकसहभागातून एक लाख पुस्तके जमा करण्याचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे उद्यानात येणाऱ्या साहित्यप्रेमींना बसण्यासाठी आसन व्यवस्था, एम्पी थिएटर, संगीत व्यवस्था स्वच्छतागृह, कॉफी हाऊस आदी सोयी पुरवण्याचा मानस आहे, त्यासाठी नगरोत्थान उपक्रमांतर्गत एक कोटी ७५ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्याची मागणी माजी नगराध्यक्ष चौधरी यांनी केली आहे.