कामांची बिले मिळत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन
ठाणे : ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणाऱ्या ठेकेदारांनी आज चक्क सरकारच्या विरोधात आवाज उठवला आहे. काम करूनही केलेल्या कामाची बिलेच मिळाली नसल्याने ठेकेदारांनी आजपासून काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून ठेकेदारांचे तब्बल १९२ कोटी थकवले असल्याने ठेकेदार शासनाच्या दिरंगाईला वैतागले आहेत. लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी राज्य सरकारकडे निधी आहे. मात्र, ठेकेदारांमध्ये देखील काही महिला आहेत, मग त्या तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत का? असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्या महिलांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. तसेच सर्वच ठेकेदार शासनाच्या या दिरंगाईला वैतागले असून कुठलेही चालू काम करण्यास ठेकेदारांनी असमर्थता दर्शवली आहे. जोपर्यंत निधी येत नाही तोपर्यंत नवीन निविदाही भरणार नसल्याची भूमिका ठेकेदारांनी घेतली आहे.
या आधी अनेकवेळा निवेदन, धरणे आंदोलन, विनंती अर्ज करूनही शासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. जोपर्यंत ठेकेदारांनी केलेल्या कामाचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशारा महाराष्ट्र ठेकेदार संघटनेने सरकारला दिला आहे.