ठाण्यात १८७१ रुग्ण सक्रिय; रुग्णालयात फक्त ११५ जण

ठाणे: शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. आज १३२ रुग्णांची भर पडली तर २६९जण कोरोनामुक्त झाले. रुग्णालयात अवघ्या ११५जणांवर उपचार सुरू आहेत. सुदैवाने आज एकही जण दगावला नाही.

महापालिका क्षेत्रातील रूग्णसंख्या कमी होत आहे. सर्वाधिक ५७ रूग्ण माजिवडे-मानपाडा प्रभाग समितीमध्ये सापडले आहेत. २१जण वर्तकनगर आणि १८ रूग्ण उथळसर प्रभाग समिती भागात वाढले आहेत. प्रत्येकी नऊ जणांची भर नौपाडा-कोपरी आणि लोकमान्य-सावरकर प्रभाग समिती परिसरात पडली आहे. कळवा प्रभाग येथे सहा रूग्ण, वागळेमध्ये पाचजण आणि दिवा प्रभाग समिती भागात चार रूग्ण नोंदवले गेले आहेत तर सर्वात कमी तीन रुग्णांची नोंद मुंब्रा येथे झाली आहे.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी २६९ रूग्ण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ७८,६६८जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी १,८७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २,१२१ जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील १,७२३ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये १३२जण बाधित सापडले. आत्तापर्यंत २३ लाख ५३,४४५ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८२,६५९जण बाधित मिळाले आहेत.