ठाण्यात मृत्यूची १८ ‘वळणे’

जिल्ह्यातील ३१ ब्लॅक स्पॉटवर होणार उपाययोजना

ठाणे : ठाणे शहरातून राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग जात असून ३१ ठिकाणी धोकादायक वळणे आणि ठिकाणे शोधण्यात आली आहेत. यापैकी सर्वाधिक १८ ठिकाणे एकट्या ठाणे शहरात आहेत. या अपघातप्रवण ठिकाणांवर विविध प्राधिकरणे एकत्रित उपाययोजना करण्याची मोहीम हाती घेणार आहेत.

रस्त्यावरील खड्डे, धोकादायक वळणे आणि भौगोलिक परिस्थिती यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत असते. प्रादेशिक परिवहन विभागाने केलेल्या सर्वेक्षणात अपघातांना आमंत्रण देणारे ३१ ब्लॅक स्पॉट आढळले आहेत. यामध्ये सर्वाधिक १८ अपघातप्रवण क्षेत्र ठाणे शहरातून जाणार्‍या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर आहेत. मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रात पाच तर ग्रामीण भागातही आठ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. प्रवासासाठी काळ ठरणार्‍या हे ब्लॅक स्पॉट कमी करण्याच्या हालचालींना आता वेग आला असून लवकरच कायमस्वरुपी उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत.

ठाण्यातून राष्ट्रीय महामार्ग-३, नाशिक-मुबई महामार्ग, मुंब्रा बायपास, कल्याण, भिवंडी, डोंबिवलीतून जाणारा आग्रा मार्ग असे प्रमुख महामार्ग ठाणे शहर आणि जिल्ह्यातून जातात. मात्र सध्या या मार्गावरील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी पावसाळयात पडणारे खड्डे, त्यानंतर झालेली दुरावस्था, साईडपट्टे नसणे, रस्त्यावर काळोख, कुठे धोकादायक वळण तर कुठे चढण अशी अवस्था अनेक ठिकाणी आहे. त्यात या मार्गावरून धावणार्‍या लहान वाहनांसह महाकाय कंटेनरची समस्या आहे. अनेकवेळा एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या नाद, तर कधी वाहनचालकाची अतिघाईमुळे वर्षभर या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असते. वारंवार अपघात घडणार्‍या अशा धोकादायक ठिकाणांचा शोध प्रादेशिक परिवहन विभागाने घेतला असून ३१ ब्लॅक स्पॉट आढळले आहेत.
सर्वाधिक अपघात घडणारी अशी १८ ठिकाणे सध्या ठाणे शहरात आहेत. गेल्यावर्षी २५ ब्लॅकस्पॉट आढळले होते. त्यातुलनेत यावर्षी केलेल्या उपाययोजनांमुळे ब्लॅकस्पॉटची संख्या कमी झाली आहे. दुसरीकडे मीरा- भाईंदर पालिका क्षेत्रातही पाचा ब्लॅक स्पॉट आढळले आहेत. स्त्यावरील कोणताही ५०० मीटरचा असा भाग जिथे गेल्या तीन वर्षांत किमान पाच अपघात झालेले ठिकाणांचा समावेश ब्लॅक स्पॉटमध्ये होतो. त्यानुसार ग्रामीण भागातील भिवंडी, वासिंद, शहापूर, कसारा या भागातही १२ ठिकाणे हे अपघात प्रवण क्षेत्र असल्याचे समोर आले आहे. या सर्व ब्लॅक स्पॉटवर गेल्या वर्षभरामध्ये अपघातांची संख्या वाढली असल्याची आकडेवारी सांगते. विशेषतः ठाणे शहरातून जाणार्‍या मार्गावर २०२३ मध्ये एकूण १५८ अपघात घडले असून त्यात ५२ जणांनी आपला जीव गमावला आहे. २०२२ च्या तुलनेत अपघातांच्या संख्येमध्ये ३६ ने वाढ झाली आहे. पण उपाय योजनांमुळे मृत्यूचे प्रमाण मात्र आठने घटले आहे. त्यामुळे आता असलेले ब्लॅक स्पॉट कमी करून अपघात व मृत्यूचे प्रमाण शून्यवर आणण्याचे आव्हान सर्वच संबंधित प्राधिकरण व वाहतूक, परिवहन विभागासमोर आहे.

अपघाताची ठिकाणे
रेती बंदर, खारीगाव टोलनाका, दिवा गाव, पिंपळास फाटा, रांजनोली नाका, माजिवाडा, कोपरी पूल, कल्याण फाटा, शिळफाटा, तीन हात नाका, ब्रम्हांड सिग्नल, गायमुख, ओवळा सिग्नल, वाघबिळ, घोडबंदर मार्ग हे ठाण्यातील ब्लॅक स्पॉट आहेत. यामध्ये माजिवाडा परिसरातून जाणारा मार्ग मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे पाहणीत समोर आले आहे. या ठिकाणी गेल्या वर्षी सर्वाधिक ४० अपघात घडले असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. २०२२ च्या तुलनेत येथे अपघात संख्या १७ ने वाढली आहे. तर दुसरीकडे मीरा- भाईंदर क्षेत्रातील घोडबंदर खिंड, पाली व्ह दिल्लीदरबार हॉटेल, काजुपाडा, हाडकेश, प्लेझेंट पार्क इत्यादी ठिकाणीही अपघातांचे प्रमाण वाढले असल्याची आकडेवारी प्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळाली आहे.

अपघात रोखण्यासाठी ब्लॅक स्पॉटचा शोध घेऊन उपाययोजना करणे हा एकमेव मार्ग आहे. त्यादृष्टीने वाहतूक विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, महापालिका, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग संयुक्त रित्या काम करते. त्या अंतर्गतच ब्लॅक स्पॉटचा शोध घेण्यात आला आहे. रस्त्यांची दुरावस्था, कुठे धोकादायक वळण, कुठे साईड पट्टी नसणे, सुचना फलक नसणे अशा अनेक त्रूटी यावेळी आढळल्या आहेत. या अडचणी दूर करून कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी काही उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्याचा अहवाला तयार केला असून जिल्हाधिकारी यांना तो देण्यात आला आहे. लवकरच त्यावर निर्णय होईल व भविष्यात ब्लॅक स्पॉट कमी होऊन अपघातांची संख्याही आटोक्यात येण्यास मदत होईल, असे ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी सांगितले.