वृंदावन-राबोडी भागात सहा लाखांच्या १८ वीजचोऱ्या

ठाणे : महावितरणच्या विविध परिमंडलात वीजचोरांविरुद्ध जोरदार मोहीम सुरु असून ठाणे २ विभागांतर्गत वृंदावन आणि राबोडी भागात सहा लाखांहून जास्त रुपयांच्या १८ ग्राहकांनी वीजचोऱ्या केल्याचे उघडकीस आले आहे.

मुख्य अभियंता, भांडुप परिमंडल, धनंजय औढेंकर यांच्या आदेशानुसार परिमंडल अंतर्गत तिन्ही मंडळात वीजचोरी शोध मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत मीटर बायपास करणे, मीटरमध्ये फेरफार व इतर पद्धतीने वीजचोऱ्या होत असल्याचे उघडकीस आले आहे. या मोहिमेत, १८ वीजचोऱ्या निदर्शनास आल्या व त्यांच्याकडे रु.६.२० लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली. वीजचोरी करणाऱ्या ग्राहकाविरुद्ध कायदेशीर कार्यवाही सुरु आहे. मोहिमेमुळे प्रामाणिक ग्राहकांमध्ये समाधानाची भावना दिसून आली व लोक प्रतिनिधींनीसुद्धा या कामात सहकार्याची भूमिका घेतली आहे.

भांडूप परिमंडलात वीजचोरीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी यापुढील कालावधीत तपास मोहीम अधिक गतिमान करण्यात येणार आहे. सदर मोहीम अधीक्षक अभियंता, अरविंद बुलबुले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता, नितीन थिटे यांच्या नेतृवाखाली राबविण्यात आली. मोहीमेस यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता उमेश लेले व जगदीश जाधव, सहाय्यक अभियंता, महेश राठोड, प्रवीण बागुल, स्वप्नील वाघ, राहुल खोबे,।शुभांगी हडके व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.