कळवा रुग्णालयात एका रात्रीत १८ रुग्णांचा मृत्यू

अपुरे डॉक्टर-कर्मचारी आणि सुविधांवर वाढला ताण

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अपुरा कर्मचारी वर्ग आणि सुविधांमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र वारंवार पाहायला मिळत असून शनिवारी रात्री पुन्हा १८ रूग्ण मृत्यू पावल्याची बाब समोर आली आहे.

सिव्हील रुग्णालय बंद झाल्यापासून ठाणे, पालघरसह रायगड जिल्ह्यातील रुग्णही याच रुग्णालयात येत असल्याने डॉक्टर-कर्मचाऱ्यांसह वैद्यकीय यंत्रणा कमी पडत आहे, 10 तारखेला एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन आंदोलन केले होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा दिवसभरात १८ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे, मात्र हे करत असताना ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय दुर्लक्षित झाले आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शनिवारी १८ रुग्णांच्या मृत्यूची बाब उघडकीस आल्यानंतर अनेक मंत्री, जिल्हाधिकारी आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी कळवा रुग्णालयात धाव घेत प्रशासनाला धारेवर धरले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी संपर्क साधून तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांनी कळवा रुग्णालयात जाऊन माहिती घेतली. या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे श्री. बांगर यांनी स्पष्ट केले. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी देखील रुग्णालयात जाऊन माहिती घेतली. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड, ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के, मनसेचे ठाणे पालघर अध्यक्ष अविनाश जाधव आदी सर्व पक्षीय नेत्यांनी पुन्हा एकदा रुग्णालयात धाव घेत अधिकाऱ्यांना खडसावले.

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या दुरवस्थेची बाब निदर्शनास आणून दिली होती. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील रुग्णांचा ताण पडत असून डॉक्टर-कर्मचारी वर्ग वाढवून पुरेशा सुविधा वाढविण्याबाबत सूचना केल्या होत्या. पावसाळ्यात रूग्ण संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करून वेळीच सावधगिरी बाळगण्याबाबत सावधगिरीचा सल्लाही दिला होता. वेळीच याकडे लक्ष दिले असते तर मृत्यूचे वाढते प्रमाण रोखता आले असते, असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वीचे प्रकरण जर गांभीर्याने घेतले असते तर आज हे घडले नसते. प्रशासनाला याचा जाब विचारायलाच पाहिजे. तसेच या १७ जणांच्या मृत्यूची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी. या प्रकरणाची चौकशी करून प्रशासनाने संपूर्ण हॉस्पिटलचे ऑडिट करून ते जाहीर करावे, अशी मागणी आ. डॉ जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

डॉक्टर २४ तास ऑन ड्युटी

रुग्णालयाचे डीन राकेश बारोट म्हणाले, “मृतांमध्ये एक चार वर्षांचा मुलगा होता. त्याने रॉकेल प्यायले होते. त्यामुळे आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. बाकीचे काही रुग्ण मागील काही दिवसांपासून उपचार घेत होते. कुणी तीन दिवस तर कुणी चार दिवसांपासून उपचार घेत होते. एका रुग्णाच्या डोक्याला मार लागला होता. या अज्ञात रुग्णाचाही मृत्यू झाला. तर अन्य एका रुग्णाच्या मेंदूला ट्रॉमा होता, त्यांचाही मृत्यू झाला. दोन रुग्णांची फुफ्फुसं खराब होती. त्या रुग्णांना संसर्ग होऊन मृत्यू झाला. इतर तीन-चार रुग्णांना मल्टी ऑर्डर डिस्फंक्शन झाले होते. कुणाला हृदयाची समस्या होती, तर कुणाला अनियंत्रित मधूमेह होता. अशा रुग्णांना वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण त्यांना वाचवू शकलो नाही”, अशी प्रतिक्रिया डीन राकेश बारोट यांनी दिले.

“आम्ही ५०० बेडच्या रुग्णालयात जवळजवळ ६०० रुग्ण दाखल केले आहेत. येथील डॉक्टर २४-२४ तास काम करत आहेत. आम्ही शक्यतो कोणत्याही रुग्णाला परत पाठवत नाही. इकडे येणारा प्रत्येक माणूस गरीब किंवा आदिवासी असतो. ते अनेकदा अत्यावश्यक स्थितीत येतात. ते कसल्याही स्थितीत आले तरी आम्ही त्यांच्यावर उपचार करतो”, असंही बारोट म्हणाले.

चौकशीसाठी समिती नेमणार-मुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, ठाणे येथे झालेली घटना दुर्दैवी असून याबाबत सकाळीच माहिती घेतलेली आहे. आरोग्य यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. सदरची घटना शासनाने अत्यंत गांभीर्याने घेतली असून सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल. त्यातून जो अहवाल येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.