ठाण्यात कोरोनाचे नवीन १८ रुग्ण

ठाणे: शहरातील कोरोना रूग्णवाढ किंचीत कमी झाली असून आज १८ नवीन रुग्णांची भर पडली तर १४जण कोरोनामुक्त झाले आहेत.

महापालिका हद्दीत सर्वात जास्त नऊ रूग्ण माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात सापडले आहेत. चार रुग्णांची भर वर्तकनगर प्रभाग समिती येथे पडली आहे. प्रत्येकी दोन रुग्णांची नोंद नौपाडा-कोपरी आणि वागळे प्रभाग समिती भागात झाली आहे. तर एक जण उथळसर प्रभाग समिती भागात मिळून आला आहे.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार सुरू असलेल्या रूग्णांपैकी १४जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१,९०७ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आठ आणि घरी १८३ अशा १९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २१३०जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील २८४ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये १८जण बाधित सापडले आहेत. आत्तापर्यंत २४ लाख २८,२३३ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८४,२२८जण बाधित मिळाले आहेत.