भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी ३१ जुलै २०२२ पर्यंत आपल्या मालमत्ता कराचा संपूर्ण भरणा केल्यास त्यांना पाच टक्के सूट मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. नागरिकांनी सदर संधीचा लाभ घेतल्याने महापालिकेच्या इतिहासात प्रथमच १४ जुलै २०२२ रोजी मध्यरात्रीपर्यंत पालिकेच्या कोषागरात एकूण मालमत्ता कर ५१ कोटी ४० लाख ३७ हजार ८९६ इतका जमा करण्यात आलेला आहे.
इतिहासात प्रथमच १५० कोटी मालमत्ता कर वसुली झाल्याने आयुक्त श्री. दिलीप ढोले यांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त (कर विभाग) संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त (कर विभाग) सुदाम गोडसे, सर्व कर निरीक्षक, कर वसुली लिपिक व कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीवर विशेष भर देत ४९४५३ नागरिकांनी एकूण २२ कोटी ५० लाख ८७,४८८ इतका कर भरणा केला आहे तर ५८,१३४ नागरिकांनी रोख रक्कम व धनादेशद्वारे (चेक) एकूण २८ कोटी ८९ लाख ५०,४०८ इतका मालमत्ता कर भरणा केलेला आहे. १५ जुलै २०२१ रोजीपर्यत २७ कोटी ६१ लाख ६८,५६० इतकी कर वसुली करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची मालमत्ता कर वसुली ही अधिक वेगाने होत असून यंदाची मालमत्ता कर वसुली उद्दिष्ट १००टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मालमत्ता कर विभाग उपायुक्त संजय शिंदे व सहाय्यक आयुक्त कर विभाग सुदाम गोडसे यांच्यामार्फत सांगण्यात आले आहे.