आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारकडून भरघोस निधी मंजूर करून आणला असून आता आणखी १५ कोटी निधी विविध विकासकामांसाठी देण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. शहरातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या खरेदी करण्याबरोबरच विविध समाजांच्या भवन निर्मितीसारख्या कामाचा यात समावेश आहे.
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या युती सरकारला पाठींबा देताना आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला प्राधान्य दिले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शेकडो कोटी रुपयांचे विकास प्रकल्प मंजूर करून घेतले. त्याबाबतचे स्वतंत्र शासन निर्णय प्रसिद्ध झाले आहेत. ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात विकासकामांना नुसती मंजुरीच नाही तर त्यासाठी पहिल्या टप्प्यात निधी वर्ग होणे व शासन निर्णयही लगेच प्रसिद्ध झाले आहेत. आता ठाणे शहरातील १३ विकासकामांसाठी आणखी १५ कोटी रुपये आमदार सरनाईक यांनी मंजूर करून आणले आहेत. ‘महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास’ या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. त्यात १०० टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहणार आहे.
ठाणे मनपा हद्दीतील वर्तकनगर येथील पाण्याच्या टाकीजवळील म्हाडाच्या भुखंडावर उभारण्यात येत असलेल्या समाज मंदिरासाठी १.२५ कोटी, आनंदनगर नाक्याजवळील ऋतू एनक्लेव्ह शेजारील म्हाडाच्या भुखंडावर उभारण्यात येत असलेल्या खुल्या रंगमंचावरील पहिला मजल्याकरिता तसेच रंगमंचा समोरील बाजूस लाद्या लावणे, कुंपन भिंत बांधणे, प्रवेशद्वार उभारणे, विद्युत रोषणाई करणे व इतर कामांकरिता १.२५ कोटी, पोखरण रोड नं. २ वरील दामजी-शामजी या विकासकाच्या आर.जी. भुखंडावर कै. सिंधुताई सकपाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्राचे प्रवेशद्वार उभारण्यासाठी २५ लाख, पोखरण रोड नं. २ वरील रौनक ग्रुपच्या सुविधा भुखंडावर ज्येष्ठ साहित्यिक हरिवंशराय बच्चन हिंदी भाषा भवन उभारण्याकरिता १ कोटी, घोडबंदर रोडवरील रौनक ग्रुपच्या सुविधा भुखंडावर दक्षिण भारतीय भवन उभारण्याकरिता एक कोटी, वाघबीळ येथील उद्यानासाठी असलेल्या जागेपैकी १५ टक्के जागेवर महाराणा प्रताप भवन उभारण्याकरिता एक कोटी, कासारवडवली येथील मैदानासाठी असलेल्या जागेवर सरदार वल्लभभाई पटेल भवन उभारण्याकरिता १ कोटी, ओवळा येथील आनंद नगर येथील उद्यानाच्या जागेवर मैथीली समाज भवन उभारण्याकरिता १ कोटी, घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील स्केअर फिट ग्रुपच्या सुविधा भुखंडावर उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत लायब्ररीकरीता फर्निचर व पुस्तकांसाठी २५ लाख, ओवळा येथील सुविधा भुखंडावर बंगाली समाज भवन उभारण्याकरिता १ कोटी निधी मंजूर झाला आहे.
महिला बचत गट भवन तसेच ज्येष्ठ नागरिक भवन उभे राहणार
घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील विहंग व्हॅलीजवळ महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रासमोरील उद्यानाच्या १५ टक्के जागेवर कै. इंदिराबाई बाबुराव सरनाईक महिला बचत गट भवन उभारण्यासाठी एक कोटी इतका निधी तसेच घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील पुराणिक बिल्डर्सच्या सुविधा भुखंडावर ज्येष्ठ साहित्यकार बाबूराव सरनाईक ज्येष्ठ नागरिक भवन बांधण्याकरीता एक कोटी, निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. शहरातील अनेक महिला बचत गटांसाठी व जेष्ठ नागरिकांसाठी ही हक्काची वास्तू त्यांना मिळणार आहे. तर ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कचरा गोळा करण्यासाठी छोट्या घंटागाड्या खरेदीसाठी १ कोटी इतका निधी मंजूर झाला आहे. शहराच्या गल्लीबोळात अंतर्गत भागात कचरा संकलित करण्यासाठी या छोट्या घंटागाड्याचा उपयोग होणार आहे. या एक कोटी निधीतून किमान १२ पेक्षा अधिक छोट्या घंटागाड्या पालिकेला खरेदी करता येणार आहेत.