२५ कोटींची २४६ मोटार वाहने जप्त
भाईंदर: वाहने एअरपोर्ट व जेएनपीटी बंदर येथे भाड्याने लावून देण्याचे आमिष दाखवून १३७५ जणांची फसवणुक करणाऱ्या आरोपीस अटक करून २५ कोटींची २४६ वाहने जप्त केली आहेत.
प्रत्येक गाडीचे दरमहा ५५ हजार ते ७५ हजार रुपये (मॉडेल प्रमाणे) भाडे मिळेल व भाड्याच्या रक्कमेतून कर्जाचा हप्ता वगळता उर्वरित रक्कम प्रत्येक गाडीमागे भाडे देतो अशी योजना सांगून बुकींगसाठी १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लेखी करारनामा करुन रोख रक्कम तसेच बँक खात्यात ऑनलाईन पैसे स्विकारून विश्वास संपादन केला. मात्र त्यानंतर वाहनांचे बुकींगसाठी घेतलेली रक्कम व गाड्यांचा अपहार करुन फिर्यादी व साक्षीदार यांची आर्थिक फसवणूक केली.
याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी संदीप कांदळकर यास अटक करून २४६ वाहने जप्त केली आहेत. मिरारोड महाजनवाडी येथे राहणारे भावेश अंबवणे, यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून काशिमिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील आरोपी संदीप कांदळकर ऊर्फ राजु जोशी यांनी नवीन गाड्या शोरुममध्ये बुक करुन या गाड्या एअरपोर्ट व जेएनपीटी बंदर येथे भाड्याने लावून प्रत्येक गाडीचे ५५ हजार ते ७५ हजार रुपये (मॉडेल प्रमाणे) भाडे मिळेल व भाड्याच्या रक्कमेतून कर्जाचा हप्ता वगळता उर्वरित रक्कम प्रत्येक गाडीमागे भाडे देतो अशी योजना सांगितली. एवढेच नव्हे तर बुकींगसाठी १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लेखी करारनामा करुन रोख रक्कम तसेच बँक खात्यात ऑनलाईन पैसे स्विकारून सुरवातीस फिर्यादी व साक्षीदार यांना गाडीचे भाडे म्हणून रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करुन फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन त्यांनतर फिर्यादी व साक्षीदार यांचे गाडीचे बुकींगसाठी घेतलेली रक्कम व गाड्यांचा अपहार करुन फिर्यादी व साक्षीदार यांची आर्थिक फसवणूक केली.
गुन्हयाचा तपास काशिमीरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शितल मुंढे करीत असून तपासादरम्यान मुख्य आरोपी राजु जोशी या बनावट नावाने फिर्यादी व साक्षीदार यांना स्वतःची ओळख सांगितली होती. परंतु तपासादरम्यान त्याचे खरे नांव संदिप कांदळकर रा. १४८, गणेशवाडी, गांव-नवशी, पो.-पिसई, ता.दापोली जि. रत्नागिरी असल्याचे उघड झाले आहे. २४ एप्रिल २०२५ रोजी संदिप कांदळकरला अटक केली तसेच त्याचा साथीदार सचिन तेटगुरे रा. दापोली, जि. रत्नागिरी यास २३ एप्रिल २०२५ रोजी अटक केली आहे. इतर सात आरोपी निष्पन्न असून त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरु आहे.
मुख्य आरोपी संदिप कांदळकर याने सह आरोपी यांचेसह संगणमत करून अंदाजे १३७५ गुंतवणुकदारांची २० कोटी ६० लाख रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे. आरोपींनी आजपर्यंत २५० मोटार वाहनांचा (पिकअप टेंम्पो व कार-चारचाकी वाहने) अपहार केल्याचे निष्पन्न झाले असून अद्याप साक्षीदार तक्रार करण्यास येत असून अपहरीत वाहने व फसवणुकीचे रक्कमेत वाढ होण्याची शक्यता आहे. आजपावेतो गुन्हयातील अपहरीत वाहनांपैकी २४६ मोटार वाहने अंदाजे किंमत २५ कोटी रुपयांची हस्तगत केली असून गुन्हयाचा तपास सुरू आहे.
गुन्हयातील मुख्य सूत्रधार संदिप सुरेश कांदळकर विरुध्द यापूर्वी मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, ‘भरुच (राज्य गुजरात) या ठिकाणी फसवणुक, अपहार या प्रकारचे एकूण १३ गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपी याने मागील १० वर्षामध्ये आर्थिक फसणुकीचे अपराध केले असल्याबाबत अभिलेख मिळाल्याने सदर गुन्हयास भारतीय न्याय संहिता कलम १११ (२) (ख) प्रमाणे संघटीत गुन्हेगारी कलमाची वाढ करण्यात आली आहे.