ठाणे : ‘महावितरण’च्या कल्याण परिमंडळात नवीन वीज जोडणीची ‘झिरो पेन्डन्सी’करण्याचा ‘पराक्रम’ करण्यात झाला आहे. एकाच दिवसात तब्बल १३६९ जोडण्या देण्यात आल्या.
‘महावितरण’चा वर्धापन दिन कल्याण परिमंडळात गुरुवारी (०६ जून) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या दिनानिमित्त नवीन वीज जोडणीचा एकही अर्ज प्रलंबित न ठेवण्याचे निर्देश मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी दिले. त्यानुसार कल्याण परिमंडळात सर्व पात्र अर्जांवर कार्यवाही करून बुधवारी एकाच दिवसांत तातडीने १३६९ नवीन वीजजोडण्या देत ‘झिरो पेन्डन्सी’चे लक्ष्य साध्य करण्यात आले.
परिमंडळामध्ये एकूण १२३२ सिंगल फेज तर थ्री-फेजच्या १३७ वीज जोडण्या बुधवारी एकाच दिवशी कार्यान्वित करण्यात आल्या. यात कल्याण मंडळ कार्यालयात एक अंतर्गत कल्याण पूर्व, पश्चिम व डोंबिवली विभागात सिंगल फेजच्या २७८ आणि थ्री फेजच्या ५७ वीज जोडण्या देण्यात आल्या.
कल्याण मंडळ कार्यालय दोनमधील उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर भागात सिंगल फेजच्या ३३२ आणि थ्री फेजच्या ३५ जोडण्या देण्यात आल्या. वसई मंडळ कार्यालयाच्या अंतर्गत वसई, विरार, वाडा, नालासोपारा, आचोळे परिसरात सिंगल फेजच्या सर्वाधिक ४१० आणि थ्री फेजच्या २४ वीज जोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या.
पालघर मंडळ कार्यालयातील पालघर, बोईसर, डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड परिसरात सिंगल फेजच्या २१२ आणि थ्री फेजच्या २१ वीज जोडण्या देण्यात आल्या. या कामगिरीबद्दल श्री. औंढेकर यांनी अधिकारी, अभियंते व कर्मचा-यांचे कौतुक केले.
वर्धापन दिनानिमित्त कल्याण मंडळ एक आणि मंडळ दोन कार्यालयांचा एकत्रित कार्यक्रम डोंबिवली पूर्वकडील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात गुरुवारी सांयकाळी चार वाजता ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या विनोदी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. तर वसई आणि पालघर मंडळ कार्यालयांच्या वतीने वसई व पालघरमध्ये स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.