ठाणे: आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या ठाणे महापालिकेवर लक्ष्मी प्रसन्न झाली असून ३१ मार्च रोजी मालमत्ता कराचे तब्बल १३४ कोटी रुपये तिजोरीत जमा झाले आहेत. त्यामुळे या विभागाची एकूण वसुली ७०४ कोटी इतकी झाली आहे. मालमत्ता कर विभागाला ७३८.७१ कोटींचे उद्धीष्ट देण्यात आले होते. ३० मार्चपर्यंत जवळपास ७९ टक्के वसुली झाली असताना आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी प्रशासनाने चांगली कामगिरी करत वसुलीची टक्केवारी ९६ टक्क्यांवर आणली आहे.
गेल्या काही वर्षांपासून ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. राज्य शासनाच्या निधीवरच शहरात विकास कामे होत आहेत. अशा स्थितीत पालिकेचे मुख्य उत्पन्न स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर विभागाच्या वसुलीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. यावर्षी शहर विकास विभागाने वसुलीत बाजी मारली, मात्र अभय योजना राबवूनही मालमत्ता कराची कामगिरी ही कासव गतीने सुरू होती. परिणामी आर्थिक वर्ष संपत आले तरी विभागाची वसुली ७९ टक्क्यांपर्यंतच पोहचू शकली.ही वसुली वाढविण्यासाठी या विभागाने मोठं मोठ्या थकबाकीदारांना नोटीस काढली होती, काही मालमत्ता सील देखिल करण्यात आल्या होत्या. तरी देखिल वसुलीचे उदिष्ट पूर्ण होताना दिसत नव्हते.
वास्तविक मालमत्ता कर विभागाला सुरुवातीला ७६१.७२ कोटींचे टार्गेट देण्यात आले. हे लक्ष्य पुढे कमी करून सुधारित ७३८.७१ वर आणण्यात आले. मात्र हे लक्ष्य पूर्ण करतानाही विभागाची दमछाक झाल्याचे दिसते.
विभागाची ३० मार्चपर्यंतची कामगिरी ही ५६९ कोटी वसुलीपर्यंत होती. एका दिवसात विभागासमोर १५५ कोटी वसुलीचे टार्गेट होते. त्यासाठी याविभागाने नवीन आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शन घेतले. मालमत्ता कर विभागाचे जी. जी. गोदापुरे आणि त्यांच्या टीमने मालमत्ता कर वसुली करिता जोर लावल्याने अखेर त्यांच्या मेहनतीला फळ मिळून एकाच दिवशी १३४ कोटी वसुल करण्यात यश आले आहे.
प्रभाग निहाय एकूण वसुली (कोटींमध्ये)
उथळसर ४५.७३
नौपाडा- कोपरी ९०.०८
कळवा २४.७८
मुंब्रा ४०.५९
दिवा ४७.८९
वागळे २५.८५
सावरकरनगर २९.०१
वर्तकनगर १०२.८५
माजिवाडा-मानपाडा २२०.४१
इतर ७६.७४
एकूण ७०३.९३