वीज कर्मचाऱ्यांचा १३ हजार कोटींचा पीएफ ट्रस्ट धोक्यात

नव्वद हजार वीज कामगारांची कुटुंबे उघड्यावर पडण्याची भीती

कल्याण : राज्यातील तिनही वीज कंपन्यांतील किमान नव्वद हजार वीज कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र चालविला जाणारा १३ हजार कोटींचा पी. एफ. ट्रस्ट भ्रष्ट विश्वस्तांमुळे आज धोक्यात आला आहे. आजमितीस या ट्रस्टचा तोटा जवळपास दोन हजार कोटींच्या घरात असून तो दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे वीज कंपन्यांतील नव्वद हजार वीज कर्मचाऱ्यांची कुटुंबे उघड्यावर पडण्याच्या भीतीने हवालदिल झाली आहेत.

महिनाअखेर पगारापोटी कपात होऊन येणारी पीएफची रक्कम ही योग्य व आरपीएफसीच्या नियमात बसणाऱ्या सक्षम वित्तीय संस्थेत न गुंतवल्याने हा तोटा होत आहे. याला वीज प्रशासन व सहा वीज कामगार संघटनांचे मनमानी गुंतवणूक करणारे विश्वस्त जबाबदार आहेत. या विश्वस्तांनी जाणून-बुजून केलेल्या अक्षम्य चुकीमुळे हे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे या विश्वस्तांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार भाई जगताप यांनी केली आहे.

ज्या वित्तीय संस्था आरपीएफसीने घालून दिलेल्या गुंतवणुकीसंबंधीच्या नियमात बसत नव्हत्या, त्या कंपन्यांमध्ये वीज कर्मचाऱ्यांची कुटुंबाची भविष्याची ठेव, जाणून-बुजून ट्रस्टच्या विश्वस्तांनी या कंपन्यांमध्ये गुंतविली आहे. यात सरळ भ्रष्टाचार दिसत असल्याने संबंधित विश्वस्तांवर गुन्हे दाखल होणे गरजेचे झाले आहे. या विश्वस्तांच्या कारभाराबाबत संघटनेचा व वीज कामगारांचा संशय अधिकच बळावला आहे. त्यामुळे ही ट्रस्ट ईपीएफओला जोडणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा नव्वद हजार वीज कामगारांची कुटुंबे आपल्या भविष्यासाठीची बचत गमावून बसतील. याविरूध्द आमदार भाई जगताप लवकरच येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवणार आहेत.