वीज कर्मचा-यांचा १३ हजार कोटींचा पीएफ धोक्यात

रक्कम वसूल करा अन्यथा आंदोलनाचा इंटकचा इशारा

कल्याण : वीज कंपन्यांचे घोटाळे बाहेर येत असतानाच आता ८८ हजार वीज कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा भविष्याचा पैसाही धोक्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन, इंटक या संघटनेने म्हटले आहे. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी व संबंधितांकडून पैसे वसूल करावे. अन्यथा आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन, इंटक या संघटनेने दिला आहे.

वीज कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा ठेवा असणारे सीपीएफ ट्रस्टच्या विश्वस्थांनी चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्यानेच वीज कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. १३ हजार कोटीचा वीज कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा ट्रस्ट, केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्तांच्या नियमाप्रमाणे राज्य वीज कंपन्या स्वतः चालवतात. म्हणून या ट्रस्टवर अर्धे ट्रस्टी कंपनी प्रशासनाचे व अर्धे ट्रस्टी कर्मचारी संघटनेचे असतात. मात्र सध्याचे ट्रस्टी, ट्रस्टकडे दुर्लक्ष करीत असल्याने व काही ट्रस्टींना पूर्ण ज्ञान नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे, असे इंटकने म्हटले आहे.

गेल्या काही वर्षापासून वीज कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ट्रस्टचा हा भोंगळ कारभार चालू असल्याने चांगल्या अवस्थेत असणारा ट्रस्ट अचानक तोट्यात आला आहे. याचे कारण ट्रस्टची गुंतवणूक राजकीय दबावाखाली चुकीच्या ठिकाणी झाली व होत आहे. या ट्रस्टने खास करून दिवाण हौसिंग, इन्फ्रास्ट्रॅक्टर लिझनिंग फायनान्स सर्व्हिसेस, व रिलायन्स कॅपिटल या ठिकाणी वरील रक्कमेची गुंतवणूक केली होती. या तीनही वित्तीय कंपन्या डबघाईला आल्याने गुंतवलेले ५६९ कोटी रुपये अडचणीत म्हणजे तोट्यात आले आहेत.
ही बाब म.रा.वि.म.भ.नि.नि. (महाराष्ट्र राज्य वीज मंडळ भविष्य निर्वाह निधी) ट्रस्टने आपल्या २०१९/२० च्या वार्षिक अहवालात नोंदवली आहे. गंभीर परिस्थिती पाहता पुढील काळात या ट्रस्टची काय परिस्थिती असेल व नक्की तोटा किती असणार याची चिंता कर्मचा-यांना लागली आहे. २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ या वर्षांचे ताळेबंद तयार असताना देखील हे आर्थिक अहवाल MSEB CPF पोर्टलवर ट्रस्टने प्रसिद्ध केलेले नाही. तो लपविण्याचा प्रकार आहे, असा गंभीर आरोप इंटक संघटनेने केला आहे.

विशेष म्हणजे एवढे सर्व होऊनही वरिष्ठ पातळीवर सर्व सुरळीत असल्याचे चित्र दाखवले जात आहे. परंतु किमान १३ हजार कोटीचा हा ट्रस्ट ८८ हजार वीज कर्मचा-यांच्या कुटुंबियांशी निगडित असल्याने ही बाब अधिक चिंताजनक झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांत संतापाचे वातावरण पसरले आहे.

या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी व संबंधितांकडून पैसे वसूल करावे. जबाबदारी म्हणून सदरील तोटा कंपनी भरून देणार असली तरी, कंपनीचा पैसा हा कर्मचाऱ्यांचा असल्याने कुणाच्या चुकीमुळे या कष्टाच्या पैशाचा दुरुपयोग का? असा प्रश्नही संघटनेने केला आहे. म्हणून सध्याच्या सर्व ट्रस्टींना घरी पाठवावे अन्यथा आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन, इंटक या संघटनेने दिला असल्याचे इंटकचे प्रवक्ते व उपाध्यक्ष राकेश जाधव यांनी म्हटले आहे.