शहरात आज नवीन १३ रुग्णांची भर

ठाणे – शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली असून आज १३ नवीन रुग्णांची भर पडली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक सात नवीन रुग्ण माजीवडा मानपाडा प्रभाग समिती येथे, तीन रुग्ण वर्तकनगर प्रभाग समिती परिसरात तर प्रत्येकी एक रुग्ण लोकमान्य सावरकर नगर, उथळसर आणि वागळे प्रभाग समिती भागात सापडला आहे. तर सर्वात कमी शून्य रूग्ण नौपाडा कोपरी, कळवा, मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती मध्ये नोंदवले गेले आहेत.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी १० जण कोरोना मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१ हजार २५७ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी १२५ जणांवर उपचार सुरू आहेत. एकही रूग्ण दगावला नाही. आत्तापर्यंत दोन हजार १२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील एक हजार ११८ नागरिकांची चाचणी केली होती. त्यामध्ये १३ जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २३ लाख ८५ हजार ३६६ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये एक लाख ८३ हजार ५०९ रूग्ण पॉझिटिव्ह सापडले.