ठाणे: शहरातील नवीन कोरोना रूग्ण वाढ सुरूच असून १३ नवीन रुग्णांची आज भर पडली तर चार जण रोगमुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णांचा आकडा शंभरच्या जवळ पोहचला असला तरी एकाही रुग्णावर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची वेळ आली नाही.
महापालिका हद्दीत माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात नऊ रुग्णांची भर पडली आहे. प्रत्येकी एक रूग्ण वर्तकनगर, लोकमान्य-सावरकर नगर, वागळे आणि दिवा प्रभाग समिती परिसरात वाढले आहेत. उर्वरित तीन प्रभाग समित्यांमध्ये एकही रूग्ण सापडला नाही.
घरी उपचार सुरू असलेल्या रूग्णांपैकी चार जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१,७०९ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर सौम्य लक्षणे असलेल्या ९९ रुग्णांवर घरी उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २,१३० रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ६३६ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये १३जण बाधित सापडले. आत्तापर्यंत २४ लाख १९,८०५ नागरिकांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,९३८ ठाणेकर बाधित मिळाले आहेत.