नवी मुंबई: राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. अशातच कामोठे वसाहतीत बारावीच्या उत्तरपत्रिकेचा अख्खा संचच रस्त्यावर सापडला असून, 28 मार्च रोजी पार पडलेल्या परीक्षेच्या या उत्तरपत्रिका आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मनसे महिला आघाडीच्या पदाधिकारी स्नेहल बागल यांना हा संच सापडल्या नंतर या बाबतची माहिती त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात दिली असून, सापडलेल्या उत्तरपत्रिका पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत. एन परीक्षा काळात घडलेल्या या प्रकारामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मनसेकडून करण्यात येणार असल्याची माहिती महिला आघाडीच्या प्रमुख आदिती सोनार यांनी दिली आहे.
दरम्यान याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कामोठे येथे राहणाऱ्या एका शिक्षकाकडून हे पेपर गहाळ झाले असल्याची माहिती संबंधित शिक्षकाने मुंबई विद्यापीठाला दिली असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.