नवी मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिसरात फलकबाजी करण्याच्या जागा निश्चित करून या जागेची माहिती पोलिसांना देण्याचे निर्देश दोन आठवड्यापूर्वी दिलें होते. त्यानुसार नवी मुंबई महानगर पालिकेने १२६ ठिकाणे जाहिरातीसाठी निश्चित केली असून रीतसर परवानगी घेऊन या ठिकाणी जाहिरात करण्याचे आवाहन केले आहे.
नवी मुंबई शहरात मोक्याच्या जागेवर फलकबाजी करून शहर विद्रूप करण्याचा प्रकार राजरोस सुरू आहे. यात राजकीय चमको आघाडीवर असतात. मात्र आता अवैध फलकबाजी करणाऱ्या या नेत्यांना आळा बसण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रामध्ये फलक, फ्लेक्स, होर्डिंग्ज लावण्यासाठी जागा निश्चित करण्याबाबत नगरविकास विभागाने अध्यादेश काढला आहे. १४ नोव्हेंबर रोजी आदेश काढले होते. या आदेशानुसार दोन आठवड्यात मनपा अधिकाऱ्यांना याबाबत अहवाल सादर करायचा होता. जनहित याचिकेच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यावर राज्य शासनाने व्यापक पावले उचलली आहेत. गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. यापुढे फलक लावण्यासाठी किंवा जाहिरात परवानगी दिल्यावर त्याची माहिती स्थानिक पोलिसांना द्यावी लागणार आहे. फलक लावताना त्यावर क्यू आर कोड लावण्यात येणार आहे. ज्यामुळे परवानगीधारकाची संपूर्ण माहिती येणार असून फलक लावताना अधिकृत असल्याचे स्पष्ट होणार आहे. या पार्शवभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने देखील शहरातील जाहिरात फलकांची जागा निश्चित केली असून १२६ ठिकाणे जाहीर केली आहेत, त्यामुळे निश्चित केलेल्या जागेव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जाहिराती अथवा फलक लावता येणार नाहीत.
विभागवार जाहिरात फलकांची संख्या
ए,विभाग,बेलापुर -१५, बी विभाग,नेरूळ-२, सी, विभाग वाशी -११, डी ,विभाग, तुर्भे-२७, ई विभाग कोपर खैरणे-७, एफ विभाग घणसोली-१३, जी विभाग ऐरोली-१२, एच विभाग दिघा-१८