१२५० कोटींची गृहकर्जे; २१७ कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण

यंदा एमसीएचआयच्या गृह प्रदर्शनात विक्रमी नोंदणी

ठाणे: `क्रेडाई एमसीएचआय, ठाणे’ यांच्या प्रॉपर्टी प्रदर्शन २०२४ ने यंदा वैभवशाली कामगिरी नोंदविली आहे. या प्रदर्शनाला यंदा तब्बल ३०,२१७ जणांनी भेट दिली. तर २१७ कुटुंबांचे ठाणे शहरात घराचे स्वप्न साकार झाले. विविध बॅंका आणि वित्त संस्थांकडून सुमारे १,२५० कोटींहून अधिक कर्जाचे वाटप करण्यात आले.

`क्रेडाई एमसीएचआय, ठाणे’ यांच्यावतीने पोखरण रोड क्र. १ वरील रेमंड मैदानावर १६ फेब्रुवारीपासून चार दिवसांचे `गृह उत्सव : प्रॉपर्टी प्रदर्शन २०२४’ भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मुंबई महानगर क्षेत्रात आघाडीवर असलेल्या बांधकाम व्यवसायिकांकडून प्रदर्शनात सहभाग घेण्यात आला. त्यात ५० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांनी १०० हून अधिक गृहप्रकल्प व व्यवसायिक प्रकल्प सादर केले होते. तर कर्जपुरवठा करण्यासाठी १५ हून अधिक बॅंका व वित्त संस्थांनी सहभाग नोंदविला.

ठाण्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या चार दिवसांच्या प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळून, प्रॉपर्टी प्रदर्शनाने यंदा वैभवशाली कामगिरी नोंदविली. ठाणे शहरात वास्तव्यासाठी शेकडो नागरिकांनी पसंती दिली, याबद्दल `क्रेडाई एमसीएचआय, ठाणे’चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी आनंद व्यक्त केला. या प्रदर्शनाला चार दिवसांमध्ये ३०,२१७ जणांनी भेट दिली. त्यात २१७ जणांनी घर वा व्यवसायिक मालमत्ता खरेदी केली. तर १,२५० कोटींहून अधिक गृहकर्जाचे वाटप करण्यात आले. या प्रदर्शनाच्या यशस्विततेसाठी क्रेडाई-एमसीएचआय, ठाणेचे पदाधिकारी, आयोजक समिती आणि सदस्यांनी नियोजन केले होते, अशा शब्दांत अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सर्वांचे कौतुक केले.

ठाणे शहर हे सांस्कृतिक, सामाजिक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उत्तम शहर आहे. मुंबई महानगर क्षेत्रात ठाणे शहराने नावलौकिक संपादन केला आहे. शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रानेही अपेक्षित विकास केला असून,ग्राहकांच्या अपेक्षा व गरजेनुसार घरांबरोबरच उत्तम जीवनशैली असलेली घरे उपलब्ध केली आहेत. घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ठाणे शहर हा उत्तम पर्याय ठरला, अशी प्रतिक्रिया `क्रेडाई एमसीएचआय, ठाणे’चे अध्यक्ष श्री. जितेंद्र मेहता यांनी व्यक्त केली.

प्रॉपर्टी प्रदर्शनाने रिअल इस्टेट क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण स्थान मिळविले आहे. ग्राहकांच्या विश्वासाने प्रदर्शनाला प्रतिष्ठा मिळाली, असे `क्रेडाई एमसीएचआय, ठाणे’चे माजी अध्यक्ष अजय आशर यांनी सांगितले.