समितीच्या मंजुरीनंतर फेरीवाला क्षेत्र होणार मंजूर
ठाणे: गेले अनेक वर्ष रखडलेल्या फेरीवाला धोरणाची काही प्रमाणात अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असून ठाण्यात १२५ फेरीवाला क्षेत्रे घोषित करण्यात आली आहेत.
उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे मंदिर, शाळा आणि अन्य महत्वाची ठिकाणे वगळून ही क्षेत्रे घोषित करण्यात आली आहेत. फेरीवाला समितीची निवडणूक अद्याप झाली नसल्याने या फेरीवाला क्षेत्रांना अंतिम मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे आचारसंहितेनंतरच समितीची निवडणूक होऊन ही क्षेत्रे अंतिम होण्याची चिन्हे आहेत.
फेरीवाला धोरण न झाल्याने महापालिका हद्दीत मागील काही वर्षात फेरीवाल्यांची संख्या अनेक पटीने वाढल्याचे दिसून आले आहे. रस्ते, फुटपाथ या फेरीवाल्यांनी व्यापल्याचे दिसत आहे. त्यामुळे या फेरीवाल्यांना हक्काची जागा देण्यासाठी फेरीवाला धोरण राबविण्यात येत आहे. दरम्यान २०१९ मध्ये ठाणे महापालिकेने केलेल्या सर्व्हेच्या आधारे ठाणे शहरात केवळ सहा हजार फेरीवाल्यांचा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये केवळ दोन हजार फेरीवाल्यांनी आपले पुरावे प्रशासनाकडे जमा केले असल्याचा दावा त्यावेळी प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला होता. दरम्यान आता फेरीवाला धोरण अंतिम करण्यात फेरीवाल्यांची संख्या १३६७ एवढी निश्चित झाली आहे.
सध्या ३० जणांची फेरीवाल्यांची समिती अस्तित्वात आहे. मात्र आता नव्याने कमिटी तयार होणार असून त्यात २० जणांचा समावेश असणार आहे. यात फेरीवाल्यांचे आठ प्रतिनिधी, पाच शासकीय प्रतिनिधी आणि उर्वरीत हे सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी असणार आहेत. त्यानुसार या समितीची निवडणुक घेण्यासंदर्भात महापालिकेने कामगार आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यानंतर आता येत्या काही दिवसात ही निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. परंतु फेरीवाला कमिटीमध्ये कोण-कोण असेल, कोणाला निवडून द्यायचे याचा निर्णय फेरीवाले मतदान करुन घेणार आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर या समितीच्या माध्यमातून फेरीवाल्यांच्या जागा निश्चित केल्या जाणार आहेत. प्रशासनाच्या वतीने सध्या शहरात १२५ फेरीवाला क्षेत्रे घोषित केली असून प्रत्येक प्रभागात १० ते १२ फेरीवाला क्षेत्रे समाविष्ट असणार आहेत.