ठाणे : बहुचर्चित आणि हजारो प्रवासी जी बातमी ऐकण्यासाठी आतुर होते अशा इलेक्ट्रिक बसेसचे आगमन लवकरच ठाणे परिवहन सेवेत होणार आहे. 185 कोटी रुपयांच्या 123 बसेस पुढील वर्षाच्या सुरुवातीला टीएमटीच्या ताफ्यात दाखल होतील.
हैद्राबादस्थित ऑलेक्ट्रा कंपनीला या बसेसची ऑर्डर देण्यात आली असून कंत्राटी पध्दतीने ईव्ही (EVEY) कंपनी त्या 15 वर्षे चालवणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. या 123 बसेसपैकी 12 मीटर लांबीच्या 55 बसेस असतील तर उर्वरित 68 बस नऊ मीटर्सच्या असतील. 55 पैकी 45 तर 68 पैकी 26 बसेस वातानुकूलित असतील. 12 मीटर्स बसेस दररोज 200 कि.मी. तर नऊ मीटर बसेस 160 कि.मी. धावतील. यापैकी मोठ्या बसेसची प्रवासी क्षमता 39 तर छोट्या बसेसची क्षमता 31 असेल. लिथिअम बॅटरीवर या बसेस चालतील. ही बॅटरी चार तासात चार्ज होईल.
ओलेक्ट्रा ग्रीनटेक या बसेसची देखभाल करणार आहे. या कंपनीच्या बसेस सध्या पुणे, मुंबई आणि नागपूर येथे धावत आहेत. आतापर्यंत या बसेसनी राज्यात तीन कोटी कि.मी. अंतर धावून सेवा दिली आहे.