जिल्ह्यातील १०६९ मुला-मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश
ठाणे: अल्पवयीन बालकांवर लैंगिक अत्याचार्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली असतानाच गेल्या वर्षभरात ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रातून तब्बल १२१९ अल्पवयीन बालकांचे अपहरण झाल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये मुलांची संख्या ३८८ तर मुलींची दुपटीहून अधिक म्हणजे ८९१ इतकी संख्या आहे. सुदैवाने त्यापैकी १०६९ मुला-मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे.
कल्याण पूर्वच्या चक्कीनाका परिसरातून १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणाने संपूर्ण ठाणे जिल्ह्यासह राज्य हादरले आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी शेगावमधून अटक केली आहे. उल्हासनगरमध्येही बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह काही दिवसांनी आढळला. यानिमित्ताने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वास्तविक २०२४ या वर्षी ठाणे जिल्ह्याला काळीमा फासणार्या अशा अनेक घटना घडल्या आहे. यामध्ये वाढत्या आपहरणाच्या घटनांनी चिंता वाढवली आहे. नवजात शिशूपासून ते १८ वर्षांपर्यंत बेपत्ता झालेल्या बालकांची नोंद अपहरणाच्या कलमांतर्गत होते. यामध्ये अनेकवेळा खंडणी, कौटुंबिक वाद, अंधश्रद्धा ही गंभीर कारणे असतात. तर अनेकवेळा घरातल्या व्यक्तींनी राखवले किंवा मारले, मनमुठाव आला म्हणून रागाच्या भरात घर सोडून जाणार्या बालकांची संख्याही लक्षणीय असते. अनेक घटना या प्रेमप्रकरणातूनही घडतात आणि दुदैवाने त्यापैकी काहींच्या नशिबी कुंटणखाना येतो. त्यामुळे पोलिस ठाण्यात पालकांनी तक्रार नोंदवताच तपासाचे चक्र सुरू होते. पोलिस परिसरासह शक्यता असलेल्या सर्व ठावठिकाणांचा शोध घेतात. त्यामुळेच अपहरण झालेल्या बालकांचा शोध लागण्याचे प्रमाणही समाधानकारक असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्राचा विचार केला असताना २०२४ या वर्षामध्ये पाचही परिमंडळाच्या हद्दीतून सुमारे १२१९ अल्पवयीन बालकांचे अपहरण झाल्याची नोंद आहे. यामध्ये ३८८ बालकांचा तर ८९१ बालिकांचा समावेश आहे. त्यापैकी १०६९ बालक स्वतःहून तर काही पोलिसांच्या यशस्वी शोध मोहिमेमुळे स्वगृही परतले आहेत. शोध लागलेल्यांमध्ये मुलांची संख्या ३६० तर मुलींची संख्या ७७० इतकी आहे. यामध्ये कल्याण, उल्हासनगरसारख्या गंभीर गुन्ह्यांचाही समावेश आहे. दरम्यान २८ मुले आणि १९१ मुलींचा शोध अद्यापी लागलेला नाही. या शून्य ते सात वयोगटातील तीन तर सात ते बारा वयोगटातील १० बालकांचा समावेश आहे. सर्वाधिक बेपत्ता मुले ही १२ ते १८ वयोगटातील ११४ आहेत. प्रेमसंबंधातून किंवा फूस लावून या मुलींचे अपहरण केल्याचा संशय आहे. या बालकांना शोधण्यासाठी पोलिसांचे पथक मेहनत घेत आहे. पण मुली पळून गेल्याच्या रागातून अनेक पालक परत पोलिस ठाण्यात अशा घटनांची माहिती देणे टाळत असल्याने ही संख्या वाढत असल्याचेही बोलले जाते.
वयोगटानुसार अपहरणाची नोंद
वयोगट मुले मुली
० त ७ १९ ११
७ ते १२ ७० ३३
१२ ते १६ १३८ २८३
१७ ते १८ १६१ ५६४
शोध लागलेले मुले-मुली
वयोगट मुले मुली
० त ७ १८ ०९
७ ते १२ ६५ २८
१२ ते १६ १२७ २३२
१७ ते १८ १५० ७७०
बेपत्ता बालके
वयोगट मुले मुली
० त ७ ०१ ०२
७ ते १२ ०५ ०५
१२ ते १६ ११ ५१
१७ ते १८ ११ ६३
जिल्ह्यातून अजूनही १२१ अल्पवयीन मुली बेपत्ता असून त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. १२ ते १८ वयोगटातील या मुली असून त्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे.
२०२४ या सालामध्ये ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या पाचही परिमंडळांमध्ये २,२६२ पुरुष हरवल्याची तक्रार नोंद झाली आहे. तर महिलांची संख्या त्याहून अधिक २,५५४ आहे. असे असले तरी सापडलेल्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. हरवलेल्यांपैकी १६३४ पुरुष तर १९३२ महिला स्वगृही परतल्या आहेत. मात्र अजूनही ६२८ पुरुष आणि ६२२ महिला बेपत्ता आहेत.