संस्था आणि भाडेकरूंनी ठामपाचे थकवले १२ कोटी

वसुली करण्याचे अधिकाऱ्यांसमोर आव्हान

ठाणे: ठाणे महापालिकेच्या मालकीच्या आणि विविध सामाजिक संस्थांना भाड्याने देण्यात आलेल्या वास्तूंचे तब्बल १२ कोटींपेक्षा अधिक भाडे थकले असून हे भाडे वसूल करण्याचे मोठे आव्हान महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागासमोर आहे. विशेष म्हणजे यामध्ये पाच कोटींपेक्षा अधिक भाडे हे रेंटलच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी थकवले आहे.

ठाणे महापालिकेच्या मालकीच्या व्यायामशाळा, तरण तलाव, सामाजिक सभागृह आणि विविध प्रकारच्या १५० पेक्षा अधिक वास्तू या सामाजिक संस्थांना भाड्याने देण्यात आल्या आहेत. या सर्व सामाजिक संस्थांबरोबर भाडेकरार देखील करण्यात आला आहे. त्यांच्याकडून महिन्याला भाडे देखील आकारण्यात येत आहे. ज्या मोठ्या वास्तू भाड्याने देण्यात आल्या आहेत, त्यांचे भाडे गांभीर्याने वसूल करण्यात महापालिकेचे प्रयत्न असले तरी लहान-लहान वास्तूंचे भाडे वसूल करण्यात अजूनही स्थावर मालमत्ता विभाग पिछाडीवर असल्याचे उघड झाले आहे. कोरोनामध्ये अनेक संस्थांनी महापालिकेचे भाडे थकवले असून हे थकीत भाडे जवळपास साडेपाच कोटींच्या घरात आहे.

धोकादायक इमारतींमधील तसेच महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पात बाधित झालेल्या नागरिकांना रेंटलच्या इमारतींमध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्व नागरिकांकडून महिन्याला दोन हजार रुपये भाडे आकारले जात असून रेंटलच्या इमारतींमध्ये सुविधांचा अभाव असल्याने कोरोनापासून हे भाडेदेखील जवळपास पाच कोटींपेक्षा अधिक थकले आहे. त्यामुळे थकबाकीचा हा आकडा १२ कोटींच्या घरात गेला असून ही वसुली करायची कशी असा प्रश्न आता या विभागाला पडला आहे.