ठाणे: आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पद्धतीने १७ मेपासून सुरु करण्यात आलेली आहे. आरटीई प्रवेशासाठी ३१ मेपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ठाणे जिल्ह्यात २९ मेपर्यंत ११,३७७ जागांसाठी १५,४३० अर्ज प्राप्त झाले आहेत.
प्रवेश प्रक्रीयेच्या कामकाजासाठी गठित केलेल्या पडताळणी समितीने प्रवेश पात्र बालकांचे प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याने पडताळणी समितीस पुरेसा वेळ देणे आवश्यक असल्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम ३१ मेपर्यंत असून पालकांनी मुदतीत अर्ज भरणे आवश्यक आहे. ३१ मे नंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत सर्व पंचायत समिती व महानगर पालिकांमध्ये एकूण ६४२ पात्र शाळा असून एकूण ११,३७७ रिक्त जागा उपलब्ध आहेत. पालकांना ऑनलाईन प्रवेश अर्ज मुदतीपूर्वी भरण्याची काळजी घ्यावी व पालकांनी आरटीई पोर्टलवर सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करावे असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.