पहिल्याच दिवशी ११२ विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारला

ठाणे पोलीस शाळेच्या व्यवस्थापनावर कारवाई करा-पूर्वेश सरनाईक

ठाणे : आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी खारकर आळी येथील ठाणे पोलीस शाळेत जवळपास ११२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. पालकांच्या संतप्त भावना आणि त्यांच्या विनंतीनुसार युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ तसेच शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्यास भाग पाडू, असा विश्वास पालकांना दिला.

आगाऊ फी भरण्याची शेवटची तारीख १२ जून आहे तरी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यांना सकाळी ७.३० वाजल्यापासून शाळेबाहेर थांबविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर या घटनेचा काय प्रभाव पडेल ह्याचा जरा देखील विचार केला नाही, असा अतोप करत पालकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

पूर्वेश सरनाईक यांनी पोलीस शाळेला भेट देऊन विद्यार्थी आणि पालकांच्या समस्या जाणून घेतल्या. शाळेच्या मुख्याध्यापिकांना भेटून चर्चा केली.
शिक्षणमंत्र्यांना याबाबत पत्र देऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी पालकांना सांगितले.

यावेळी युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितिन लांडगे यांच्यासह युवासेना आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.