ठाणे आयुक्तालय हद्दीत ११०६ पाकिस्तानी, पण सारे सिंधी!

तात्पुरत्या १७ पर्यटकांची देशवापसी

ठाणे : ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये तब्बल ११०६ पाकिस्तानी नागरिक असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मात्र हे पाकिस्तानी असले तरी तेथील सिंध प्रांतातील असून त्यापैकी हजार सिंधी पाकिस्तानी १० वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ठाण्यातील उल्हासनगर आणि परिसरात वास्तव्याला आहेत. त्यापैकी तात्पुरत्या व्हिजावर असलेले १७ पाकिस्तानी नागरिक आता परतीच्या वाटेवर आहेत.

पेहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आता भारतात आलेल्या प्रत्येक पाकिस्तानी नागरिकांना टिपून त्यांच्या देशात धाडण्याची माहिम उघडली आहे.
महाराष्ट्र सरकारनेही या आदेशाची अंमलबजावणी करत राज्यात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची माहिती गोळा केली आहे. यावेळी ४७ शहरांमध्ये तब्बल ५०२३ पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत. यामध्ये ११०६ पाकिस्तानी हे एकट्या ठाणे जिल्ह्यात असल्याचे समोर आले आहे. याविषयी ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या विशेष शाखेशी संपर्क साधला असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण हे पाकिस्तानी नागरिक ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर या शहरात सर्वाधिक असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. यामध्ये १७ पाकिस्तानी हे तात्पुरत्या व्हिजावर भारतात आले होते.

उल्हासनगरमध्ये सर्वाधिक सिंधी लोकवस्ती असून येथील नातेवाईकांच्या भेटीसाठी ते आले असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या सर्व पाकिस्तानींना तत्काळ देश सोडण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार १४ जण रविवारी मायदेशी परतले असून उर्वरित तीनजण २८ एप्रिलला पाकिस्तानला रवाना होणार असल्याची माहिती पोलिसांच्या विशेष शाखेचे उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.

देशाची फाळणी झाल्यावर सिंध प्रांत पाकिस्तानात गेला. त्यावेळी हजारो सिंधी नागरिकांनी ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरात आसरा घेतला. त्यामुळे उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात सिंधी समाजाचे रहिवासी असून ते भारतीय आहेत. येथील राज्यघटनेनुसार त्यांना सर्व अधिकार मिळाले आहेत. पण त्यापैकी शेकडो सिंधी आजही भारतीय नागरिकत्वाच्या प्रतिक्षेत आहेत. यामध्ये गेल्या दोन दशकांमध्ये पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून लाँग टर्म व्हिजावर आलेल्या नागरिकांचा भरणा हा सर्वाधिक आहे.
लाँग टर्म व्हिजावर असलेल्या सिंधी पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचे अद्याप कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे त्यांना घाबरण्याची गरज नसल्याचेही ठाणे पोलिसांनी सांगितले आहे.

पाकिस्तानच्या केवळ सिंध प्रांतातून स्थलांतरीत होणार्‍या नागरिकांनाच भारतात लाँग टर्म व्हिजा दिला जातो. त्यानुसार उल्हासनगरमधील सिंधी नागरिक दरवर्षी आपल्या व्हिजाचे नुतनीकरण करतात. अनेक वर्षांपासून ते उल्हासनगरात व्यापार, उद्योगही करत असून येथेच कायमचे स्थायिक होण्याची त्यांची इच्छा आहे. गेल्या वर्षी १४ ऑगस्ट २०२४ ला उल्हासनगरातील अशा ५४ सिंधी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले होते.