राज्यातील शाळांना 1100 कोटी रुपयांचे अनुदान

मुंबई : राज्यातील शाळांना 1100 कोटी अनुदान देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. या  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

6010 प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना तसेच 14 हजार 862 तुकड्यांना अनुदान मिळेल. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे 63,338 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना होणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाची माहिती देताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत की, आज मंत्रिमंडळाने सर्व शाळा आणि तुकड्याने 20 टक्क्यांप्रमाणे अनुदान, यातच ज्यांना अनुदान नाही त्यांना 20 टक्के, तसेच जे 20 टक्क्यांच्या टप्प्यात आहे, त्यांना 40 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच 40 टक्के असणाऱ्यांना 60 टक्के अनुदान देण्यास मान्यता देण्यात येणार आहे. यामुळे 63,338 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना लाभ मिळणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.